
सामना ऑनलाईन । वेल्स
बलात्कार म्हणजे फक्त ‘बॅड सेक्स’ असतं, त्यासाठी कठोर शिक्षा दिली जाऊ नये, असं बेताल वक्तव्य एका लेखिकेने केलं आहे. ऑस्ट्रेलियन लेखिका आणि शिक्षिका जर्मिन ग्रीअर हिने हे विधान केलं आहे. या विधानामुळे जर्मिनला टीकेला सामोरं जावं लागत आहे. जर्मिन ग्रीअर (७९) ही तिच्या १९७० साली आलेल्या ‘द फिमेल युनक’ या लोकप्रिय पुस्तकासाठी ओळखली जाते.
जर्मिन यांच्या म्हणण्यानुसार, बलात्काराच्या बहुतेक प्रकरणांमध्ये महिला जखमी होत नाही. बलात्कार ही एक असंवेदनशील, बेजबाबदार लैंगिक कृती आहे. हीच गोष्ट दांपत्यादरम्यान असलेल्या लैंगिक संबंधांसाठीही लागू होते. जर पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार आहे. अशी प्रकरणं न्यायालयात कधीच सोडवली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बलात्कार हा हिंसक अपराधांच्या श्रेणीत ठेवण्यापेक्षा परवानगीशिवाय झालेला ‘बॅड सेक्स’ मानला जायला हवा आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असू नये, असं जर्मिन यांनी म्हटलं आहे.
वेल्समध्ये झालेल्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जर्मिनने हे विधान केलं. त्यामुळे अनेक स्त्रीवादी संघटनांनी या वक्तव्याचा विरोध करताना, जर्मिनने सर्व मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं आहे. बलात्काऱ्यांसाठी कडक कायदे बनण्याच्या मार्गावर हे विधान अडथळा ठरू शकतं, असंही या संघटनांचं म्हणणं आहे. या विधानानंतर या महोत्सवातून अनेकांनी बाहेर पडणं पसंत केलं.



























































