
>>रविप्रकाश कुलकर्णी
सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा करता येतात असं नाही. शेवटी काही गोष्टी राहून जातात. अशी रुखरुख लावणाऱया गोष्टीत एक गोष्ट राहून गेली आणि ती म्हणजे उर्दू भाषा जाणून घेण्याची. नाही म्हणायला सेतुमाधवराव पगडी, विद्याधर गोखले ते अगदी प्रदीप निफाडकरांपर्यंत लेखकांनी जे जाणकारीने लिहिलं आहे ते मी मनःपूर्वक वाचलं आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्नदेखील करतो. तरी वाटत राहतं, आपल्याला मुळातून वाचायला यायला हवं होतं.
अर्थात प्रत्येक प्रश्नाला आपण आपल्यापरीने उत्तर शोधतच असतो, समाधान करून घेत असतो. तसं मी पण करत आहे-
हज़ारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन
फिर भी कम निकले
निकलना खुल्द से आदम का
सुनते आए हैं लेकिन
बहुत बे आबरू होकर तेरे कुचे से हम निकले ।
म्हणजे काय तर ‘मनात हजारो इच्छा-आकांक्षा आहेत. त्यांच्या तीव्रता आणि उत्कटतेमुळे प्राण पंठात येतो. माझ्या पुष्कळ इच्छांची पूर्तता झाली असली तरी पण त्या कमीच वाटतात. आदिमानवाची स्वर्गातून हकालपट्टी झालेली आम्ही ऐकत आलो, त्याप्रमाणे अवमानित होऊन आम्ही तुझ्या गल्लीतून हाकलले गेलो.’
असमाधानी लोकांच्या दुखऱया नसेवर मलमपट्टी करणारे अनेक असतील-आहेतही, पण वर सांगितलेल्या चार ओळींची मजा काही वेगळीच. असा मनावर फुंकर घालणारा कोण तर त्यानेच सांगून टाकलंय…
हैं और भी दुनिया में सुख़न-वर बहुत अच्छे
कहते हैं कि ‘ग़ालिब’ का है अंदाज़-ए-बयाँ और
…तर हे वेड असं असतं जे पिच्छा कधी सोडत नाही. त्यांच्यासाठी पण गालिबने सांगितलं आहे-
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश ‘ग़ालिब’
कि लगाए न लगे और बुझाए न बने
कुठल्याही प्रेमाचं एवढं अचूक वर्णन करणारा तो एकमेव गालिब…आयुष्याच्या वळणावळणावर भेटत राहतो.
पण हल्लीच गालिबबद्दल अधिक कळलं ते नंदिनी आत्मसिद्ध यांच्या ‘कार्ल मार्क्सचा कॉम्रेड गालिब’ या लेखातून. ‘युगांतर’ 1922च्या दिवाळी अंकात हा लेख आला आहे. कार्ल मार्क्स आणि गालिब यांच्या दोन पत्रांची त्यात हकिगत आहे. मार्क्सला गालिब भेटला तो फ्रेडरिक एंगल्सने गालिबच्या शायरीचं अनुवादित पुस्तक त्याला दिलं त्यातून! 21 एप्रिल 1967 रोजी लिहिलेल्या पत्रात मार्क्सने उद्धृत केलंय –
हम को मालूम है
जन्नत की ह़क़ीकत लेकिन
दिल को ख़ुश रखने को
‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है
…आणि अर्थातच पुढे क्रांतीने भारलेल्या मार्क्सने गालिबनेदेखील क्रांतीचा सुस्पष्ट संदेश देणारं काव्य लिहावं असं म्हटलं आणि सोबत कम्युनिस्ट मॅनिफेस्टो पाठवून दिला !
त्या पत्राला पोच देताना गालिबनं लिहिलं आहे, ‘पहिलं म्हणजे तुम्ही काय लिहिलंत ते माझ्यासाठी समजून घेणं कठीण आहे आणि दुसरी गोष्ट, मी आता म्हातारा झालो आहे. फारसं लिहीत-बोलत नाही.’
नंदिनी आत्मसिद्ध याबाबत नोंदवतात, ‘या पत्रलेखनाच्या काळात मार्क्सचं वय 50 वर्ष आणि गालिबचं 70 वर्ष होतं.’
ही पत्रं ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’च्या अबिदा रिप्ले यांच्यामुळे प्रकाशात आली आहेत आणि त्याची माहिती नंदिनी आत्मसिद्ध यांनी दिलेली आहे. आता प्रत्यक्षात ती पत्रं केव्हा प्रकाशित होतात ते पाहायचे आहे. आता हे सगळं सांगायचं कारण 15 फेब्रुवारीला गालिबच्या स्मृतिदिनी अनेक जण गालिबच्या आठवणी जागवतात (मृत्यू 15 फेब्रुवारी 1869), त्यात माझीही ही आठवण!


























































