घणसोलीत भाजपचे पदाधिकारी शिवसेनेत, गणेश नाईकांना आणखी एक धक्का

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजप आमदार गणेश नाईक यांना धक्के बसण्याची सुरू झालेली मालिका अद्याप थांबलेली नाही. 14 नगरसेवकांपाठोपाठ घणसोलीतील भाजपच्या 25 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू झाल्यामुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रात भाजपची अवस्था दयनिय झाली आहे.

नवी मुंबईतील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, जिल्हा सचिव बिपिन तायडे, घणसोली तालुका अध्यक्ष प्रमोद कदम, सचिव सविता गाढवे, महिला उपसचिव रूपाली पोवार यांच्यासह 25 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन एका विशेष समारंभात शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना उपनेते-महाराष्ट्र राज्य पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय नाहटा आणि विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्य वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले. इतक्या मोठ्या संख्येने पदाधिकारी पक्षातून बाहेर पडल्यामुळे घणसोली मतदार संघात भाजपला मोठे खिंडार पडले असून पालिका निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांची डोकेदुखी वाढली आहे.

तनुजा मढवी राष्ट्रवादीत

जुईनगरमधील भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मढवी राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे जुईनगरमधून भाजपचा सुपडासाफ झाला आहे. जुईनगरमध्ये तीन प्रभाग आहेत. त्यापैकी दोन प्रभागांमध्ये शिवसेनेचे रंगनाथ औटी आणि विशाल ससाणे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता मढवी राष्ट्रवादीत गेल्यामुळे जुईनगरमध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या