
सामना ऑनलाईन । मनमाड
एक लाख तीस हजार लोकसंख्या असलेल्या मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा देण्याबाबत शासन नेहमीच सापत्नपणाची वागणूक देत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे शहराचा विकास आणि वाढ खुंटली आहे. मनमाडकरांची ही घोर उपेक्षा थांबवावी यासाठी मनमाड बचाव कृती समितीतर्फे शहरात चौकाचौकांत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
बचाव समिती बरोबरच शहरांतील सर्व राजकीय पक्ष संघटनांनी मनमाड तालुक्याच्या मागणीला पाठिंबा देत समर्थन केले. घंटानाद आंदोलनाने शहर दणाणून गेले. मनमाड तालुका झालाच पाहिजे अशा घोषणा देत आणि घंटा वाजवत महात्मा फुले चौक येथून या आंदोलनाला प्रारंभ झाला. बघता काय सामील व्हा, असे आवाहन करत नागरिकांतून जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथेही घंटानाद करून राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकात्मता चौकात या घंटानाद आंदोलनाचा समारोप झाला. तत्पूर्वी चौकाचौकात मनमाड तालुक्याची गरज व्यक्त करून बचाव समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. एकात्मता चौकात नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे व प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे मयूर बोरसे, स्वारिपचे विनय गरूड, रिपाइंचे गंगाभाऊ त्रिभुवन, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे फिरोज शेख आदींसह भाजपचे नितीन पांडे, जयकुमार फुलवानी , काँग्रेसचे अशोक व्यवहारे, ज्येष्ठ नागरिक संघाचे संतोष बाकलीवाल, राष्ट्रवादीचे योगेश जाधव, पीआरपीचे शहराध्यक्ष सुनील साळवे, व्यापारी महासंघाचे राजाभाऊ पारीक, सुभाष नहार, अध्यक्ष युनूस पठाण, नरेश कांबळे, रामदास पगारे, विजय जैन, महेंद्र गरूड, फकिरराव शिवदे, सुरेश वाघ, कृष्णा पगारे, रिपाइंचे कैलास आहिरे, योगेश बोदडे, मनोज गांगुर्डे, पुंडलिक कचरे, गणेश गरूड, सुषमा तिवारी, सुरेश वाघ आदींसह सर्व स्थरांतील कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
५८ वर्षांपासून स्वतंत्र मनमाडची मागणी
गेल्या ५८ वर्षांपासून मनमाड तालुक्याची मागणी केली जात आहे. नाशिक जिह्यातील सर्वात मोठे तिसऱया क्रामांकाचे १ लाख ३० हजार लोकसंख्येचे शहर म्हणून ओळखले जाते. देवळा, सटाणा, त्र्यंबक, येवला वगैरे तीस ते चाळीस हजार लोकसंख्येच्या शहरांना तालुक्याचा दर्जा दिला गेलेला आहे. पण शासनाला मोठा महसूल देणाऱ्या मनमाड शहराची मात्र घोर उपेक्षा शासनाने केली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शांततापूर्ण मार्गाने सध्या आंदोलन सुरू असले तरी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बचाव समितीने दिला आहे.































































