तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते…, 22 पानांची चिठ्ठी लिहून बहीण-भावाने संपवले जीवन

गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका गुप्तचर ब्युरो (IB) अधिकाऱ्याचे आणि त्याच्या बहिणीने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून यामागचे कारणही मन हेलावणारे आहे. हे दोघेही भाऊ आणि बहीण सावत्र आईसोबत राहत होते. पहिल्या आईच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या प्रेयसीशी लग्न केले होते.लग्नानंतर वडिलांनी आणि सावत्र आईने दोन्ही मुलांना त्रास द्यायला सुरुवात केली. या गोष्टीला कंटाळून दोन्ही भावंडानी आत्महत्या केली. एवढेच नाही तर मृत्यूपुर्वी मुलीने तब्बल 22 पानी पत्र लिहिले आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपुरम कॉलनीतील घर क्रमांक एच-352 मध्ये ही घटनी घडली. सुखबीर सिंग यांचा मुलगा अविनाश कुमार सिंग आयबी दिल्लीत काम करत होता. तर बहीण अंजली शिक्षण घेत होती. गुरुवारी हे दोघेही घरातच होते. त्यांची सावत्र आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी या दोन्ही भावंडांनी आत्महत्या केली. काही वेळाने आई घरी आली तेव्हा खोली आतून बंद होती. त्यामुळे आईने दोघांनाही फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर तिने शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला तेव्हा दोघेही जमिनीवर पडलेले होते. यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

अविनाश कुमार आणि अंजलीच्या अशा निधनामुळे परिसराच एकच खळबळ उडाली होती. या दोघांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले असावे यासंदर्भात चौकशी सुरु असताना हाती एक मोठा पुरावा लागला. तो म्हणजे आपलं जीवन संपवण्यापूर्वी अंजलीने लिहिलेली 22 पानी सुसाईड नोट सापडली आहे. यामुळे या घटनेचा उलगडा झाला. या नोटमध्ये अंजलीने वडिलांबद्दलची खंत लिहिली होती. आमच्या मृत्यूसाठी मिस रितू (सावत्र आई) आणि सुखवीर सिंग (वडील) जबाबदार आहेत. महिम (मित्र) माझ्या खात्यातील पैसे आणि पीएफचा मालक असेल. मिस रितू आणि सुखवीर सिंग यांनी आमच्या चितेला हात देखील लावू नये. फक्त महिम मला अग्नी देईल, असे अंजलीने तिच्य पत्रात लिहिले आहे.

आमचे वडील सुखवीर सिंग आणि आई रितू आम्हाला त्रास देत होते. वडिलांचा सावत्र आईवरच विश्वास होता. एखाद्या मुलाला फक्त जन्म देणे आणि त्याचा खर्च करणे म्हणजे आई वडिलांचे कर्तव्य नसतं. तर त्या मुलांना वेळ देणं त्यांना समजून घेणे देखील तितकच आवश्यक असतं. सुखवीर सिंग, मला तुम्हाला बाबा म्हणायची देखील लाज वाटतेय. तुम्हाला आमच्या मृतदेहाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुमच्या स्वतःच्या मुलांच्या आनंदावर विरझण घातलयत. खरचं आईशिवाय जगणं खूप कठीण असतं, अशी भावनिक नोट अंजलीने लिहिली होती.

अंजलीने तिच्या सावत्र आईलाही सुनावले. हुशारीने ही पाने फाडु नका, मी त्याचे फोटो सर्वांना पाठवले आहेत. मी तुमच्यासोबत 16 वर्षे राहिली आहे. त्यामुळे मला माहिती आहे तुमची हुशारी. म्हणून डायरीत लिहिलेली पाने फाडू नका. कारण मी त्यांचा फोटो काढून अनेक लोकांना पाठवला आहे.आम्ही दोघेही भाऊ आणि बहीण मानसिक तणावाखाली होतो त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागला, असे तिने या चिठ्ठित लिहिले होते.

अविनाश, अंजलीच्या मामाने देवेंद्र यांनी कवीनगर पोलिसात याबाबत तक्रार केली आहे. देवेंद्र सिंह यांनी मृतकाच्या वडिलांवर आणि सावत्र आईवर त्यांच्या मुलांना जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.