
ऊन-वारा-पाऊस आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीला भीक न घालता शेतकऱयांनी तब्बल 380 दिवस राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले. बळीराजाच्या एल्गारपुढे मोदी सरकार झुकले आणि तीन काळे कृषी कायदे मागे घेतले. शेतकऱयांचा प्रचंड विजय झाला. शनिवारी हजारो शेतकऱयांनी आंदोलन मागे घेत सिंघू, टिकरी, गाझिपूर सीमा सोडली. हजारो ट्रक्टर-ट्रॉली, 5 हजार कार, 3 हजारांवर टेम्पोमधून तंबू, लंगरचे साहित्य घेऊन अन्नदाता आपल्या गावी निघाला. यामध्ये महिला शेतकरीही मोठय़ा संख्येने होत्या.
राष्ट्रीय महामार्गांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 50वर डीजे यात सामील झाले होते. ‘तैनू जित्त के दिल्लीए पंजाब चल्ले आ’, ‘जिंदाबाद किसानी’, ‘किसान एंथम’, ‘दिल्ली जित्त के आ सजना, मैं सडकां ते दीवे जगा दूंगी’, या पंजाबी गायकांच्या प्रसिद्ध गाण्यांवर शेतकऱयांनी जबरदस्त भांगडा केला. शेतकऱयांचे पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानात अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. पंजाबमध्ये शेतकऱयांवर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली.




























































