शालिमार एक्प्रेसमध्ये जिलेटिनची ‘कंडी’, फटाक्याची दारू सापडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकमान्य टिळक टर्मिनसच्या यार्डात उभ्या असलेल्या शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटिनच्या कांडय़ा सापडल्याची बोंब झाली आणि सगळेच कामाला लागले. प्रसारमाध्यमांपासून बॉम्बशोधक पथकापर्यंत सर्वांनीच आपापली आयुधे परजत यार्डाच्या दिशेने धाव घेतली. दोन तासांच्या शोधानंतर जाहीर झाले, अरे ही तर फटाक्याची दारू!… पण तोपर्यंत ब्रेकिंग न्यूज चालल्या होत्या मुंबईतील हाय ऍलर्टच्या!!

आज सकाळी शालिमार एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डात थांबली होती. कोच बंद करत असताना एका कामगाराला खिडकीजवळ एक पिशवी दिसली. त्यात जिलेटिनसदृश काडय़ा, वायर आणि बॅटरी होती. त्या व्यक्तीने याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस आणि आरपीएफला दिली. काही वेळात बॉम्बशोधक पथक घटनास्थळी आले. कोचमध्ये सापडलेल्या त्या जिलेटिनच्या काडय़ा नव्हत्या, तर प्लॅस्टिकच्या पाइपमध्ये फटाक्याची दारू भरलेली होती. तसेच ती बॅटरीदेखील बंद अवस्थेत होती असे टिळक नगर पोलिसांचे म्हणणे आहे.

– पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात एकाचा मोबाईल नंबर आणि फोटो होता. त्या नंबरवर पोलिसांनी संपर्क केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोघांची चौकशी केली होती. कोणाला तरी धडा शिकवण्याच्या हेतूने हे कृत्य केले असावे असा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळाहून जप्त केलेल्या वस्तू या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या जाणार आहेत.

– आरपीएफने काही स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एक्स्प्रेस मुंबईला येतेवेळी त्या कोचमध्ये कोणी व्यक्ती चढताना दिसत नसल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अश्रफ यांनी सांगितले.