
पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघ निवडीबाबत मोठं विधान करत चर्चेला नवा पेटारा उघडला आहे. शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांच्यातील ‘सलामीवीराची लढाई’ अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. कर्णधाराच्या घोषणेनुसार, गिल सलामीवीर म्हणून उतरणार असून, या निर्णयामुळे संजू सध्या पिचऐवजी बेंचवर बसलेला दिसेल.
हा निर्णय केवळ फॉर्म पाहून नाही, तर संघातील समतोल आणि भूमिका लक्षात घेऊन घेतला गेला असल्याचे सूर्यकुमारने स्पष्ट केले. फक्त वैयक्तिक कामगिरी नव्हे, तर टीम कॉम्बिनेशन महत्त्वाचं आहे,’ असं सांगत सूर्याने गिलचे स्थान पक्के असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
शुभमन गिल जवळपास वर्षभरानंतर एशिया कपच्या माध्यमातून टी-20 संघात परतला होता. या काळात त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष पेंद्रित केलं होतं. व्यवस्थापनाच्या मते, गिल हा ‘ऑल-फॉरमॅट फ्युचर स्टार’ आहे आणि म्हणूनच त्याला टी-20तही पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे. तीसुद्धा सलामीवीराची.
संजू संघात आला तेव्हा त्याने वरच्या फळीत फलंदाजी केली आणि उत्कृष्ट कामगिरीही केली, पण टी-20मध्ये सलामीवीराव्यतिरिक्त उर्वरित सगळय़ांना लवचिक राहावे लागते. शुभमन श्रीलंकेविरुद्ध सलामीलाच खेळला होता. म्हणून त्याला ती जागा परत मिळणं योग्य असल्याचे सूर्यकुमारने सांगितले. संजूसाठी संघाचे दार बंद झालेले नाही. फक्त सध्या गिलला प्राधान्य दिले गेले आहे, असेही सूर्याने स्पष्ट केले.



























































