
गणेशोत्सवानिमित्त ‘गिरगावचा राजा’ला तब्बल 800 किलोचा मोदक अर्पण करण्यात आला. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियात याची नोंद झाली आहे. बेसन, साखर, दूध आणि माव्यापासून बनवलेला हा भव्य मोदक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर हा मोदक भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आला.
‘गिरगावचा राजा’ हा मुंबईतील सर्वात जुन्या आणि मानाच्या सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक आहे. मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तीमुळे आणि झगमगाटाऐवजी परंपरेला दिलेल्या प्राधान्यामुळे या मंडळाला विशेष ओळख मिळाली आहे. यावर्षी विक्रमी मोदकाच्या लोकार्पणामुळे या परंपरेला एक नवा आयाम मिळाला, अशी प्रतिक्रिया मंडळाचे सचिव गणेश लिंगायत यांनी दिली.