गिरगावात शटर आड खाणे – पिणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात लॉकडाऊन सुरू असून त्याचे सर्व व्यावसायीक पालन करत असताना गिरगाव परिसरातील एक हॉटेल चालक मात्र मनमानी कारभार करत होता. हॉटेल बंद असल्याचे भासवून शटर आड सर्वकाही सुरळीत चालू होते. अखेर व्हि पी रोड पोलिसांनी त्या हॉटेलवर धडक कारवाई केली.

संचारबंदी लागू असताना पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे गुन्हा ठरतो. त्यात हॉटेल सुरू ठेवण्यात सक्त मनाई आहे, असे असतानाही पठ्ठेबापुराव मार्गावर असलेले अमिर नावाचे हॉटेल मात्र बंद शटर आड सुरू होते. ग्राहकांना हॉटेलमध्ये घेऊन त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था पुरवली जात होती. हा प्रकार समजताच व्हि पी रोड पोलिसांनी अमिर हॉटेलवर धडक दिली. तेव्हा हॉटेलमध्ये पीचपेक्षा जास्त लोक मिळून आले. मात्र त्यावेळेस हॉटेल चालकाने पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या कामात अडथळा आणला. तसेच स्वतः ला मारून घेईन आणि तुम्ही मारल्याचे सांगेन असे धमकावू लागला. पण पोलिसांनी त्याच्या मनमानीपणा न जुमानता मालकासह अन्य दोघांवर भादवि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल केला.