शाळेने दिले जगण्याचे तंत्र आणि मंत्र: गिरीष ओक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा 

ज्या मातीने आपल्याला घडवलं… ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो… आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले. त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यासह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी एडेड माजी विद्यार्थी महासंमेलनानिमित्त चालून आली आहे… शाळेचे दिवस संपले की, प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. परंतु ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच राहते. शाळेतील बालपणीचे अनेक खोडकर प्रसंग, शिस्त, ज्ञान असा परिवेशच आपले आयुष्य घडविते, असे प्रतिपादन मराठी अभिनेते गिरीष ओक यांनी केले.
एडेड हायस्कूलच्या प्रांगणात आज २२ डिसेंबरला आयोजित माजी विद्यार्थी महासंमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. महासंमेलनाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा बहुद्देशीय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र गोडे तर स्वागताध्यक्ष म्हणून बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, एडेडचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, आयोजन समिती अध्यक्ष श्रीकांत देशपांडे, संस्था सचिव अ‍ॅड. प्रदीप कविमंडन, प्रा. महाजन, शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, किशोर केला, प्राचार्य आर.ओ. पाटील, रामकृष्ण आश्रम संभाजीनगरचे स्वामी अनंतराधन महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. सामूहिक राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञा घेण्यात आली.
विज्ञानाच्या दृष्टीकोनातून २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असला तरी, एडेड शाळेच्या माजी विद्यार्थी मिळाल्याने तो सर्वात मोठा झाल्याचे सांगून एडेडने माझ्यासारखे कितीतरी यशस्वी विद्यार्थी घडविले असून स्थानम् महात्म्य असणार्‍या एडेडमध्ये विद्या संपादन करणार्‍यांच्या उज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष राध्येशाम चांडक यांनी या प्रसंगी केले. एडेड शाळेतून स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची शिदोरी घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात कर्तृत्व संपन्न झालेत. ९० वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटूनही या माजी विद्यार्थ्याची एडेडशी जूळलेली नाळ घट्ट आहे, ती अधिक घट्ट होण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचा नावलौकीक वाढविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावा असे विचार गोडे यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वागत सोहळ्यानंतर एडेड शाळेतील सेवानिवृत्त झालेल्या गुरुजनांना महासंमेलन समितीचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे व अंजली परांजपे यांच्या हस्ते कृतज्ञांजली मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह आणि पुणेरी पगडी घालून सन्मानित करण्यात आले. यामध्ये ए.जी. देशपांडे, बी.एस. देशपांडे, कुंदाताई वाईकर, पी. एन. पाटील, निकाळजे, डी.टी. जाधव, देवल, पी.पी. पंत, सौ.वानखडे, नारखेडे, र.ग.ठोसर, इंडोले, निंबाळकर, उबरहंडे, बंडे, खपली, नीलिमा देशपांडे, सौ.पाठक, सदानंद केने, प्राचार्य यू.बी. राजपूत तसेच गणोरकर यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. गणोरकर यांनी हा सन्मान स्वीकारला. दरम्यान त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शाळा व्यवस्थापनाला योगदान म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश दिला. श्रीकांत देशपांडे यांनी प्रास्ताविकातून ९० वर्षाचा शालेय इतिहास माजी विद्यार्थी मेळाव्यातून उलगडणार असल्याचे सांगून आलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी एक विद्यार्थी, एक पुस्तक या उपक्रमाला प्रतिसाद देऊन शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अक्षयधन उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. यावेळी ए.जी. देशपांडे, बी.एस. देशपांडे, सौ. वाईकर उबरहंडे, डॉ.प्रमोद देशमुख या सेवानिवृत्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थिनी तथा यशस्वी उद्योजिका सुप्रिया बडवे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान एडेड हायस्कूल माजी विद्यार्थी महासम्मेलन समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मृतीगंध स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवर व स्मरणिकेचे संपादक रघुनंदन देशपांडे, पत्रकार रणजितसिंग राजपूत, अमर चिंतळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे बहरदार संचालन उन्मेश जोशी व अंजली परांजपे यांनी केले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांची बहुसंख्य उपस्थिती होती.