
मुलीचे प्रेमप्रकरण तोडण्यासाठी मांत्रिकाचा आधार घेणे एका दाम्पत्याला चांगलेच भारी पडले आहे. नवी मुंबईत राहणारे अखलाक खान व रेश्मा खान यांना एका मांत्रिकाने त्यांच्या मुलीचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी 25 विटा दिल्या होत्या. याच विटा मुरुड तालुक्यातील ताडगाव येथील विहिरीत टाकत असताना काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यामुळे घाबरलेल्या दाम्पत्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने विहिरीत विष टाकल्याची बोंबाबोंब झाली. या दोघांना पोलिसांच्या हवाली देताच घाबरलेल्या अखलाक व रेश्मा यांनी हे सर्व आपण का केले याचा पाढाच वाचला. तसेच विहिरीतील पाणी पिऊन दाखवले. मात्र जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अखलाक व रेश्मा यांच्या मुलीचे तुर्भे येथील एका मुलासोबत सहा वर्षांपासून प्रेम आहे. या प्रेमप्रकरणाला त्यांचा विरोध आहे. आईवडील लग्न लावून देत नसल्याने मुलीने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. यामुळे हे प्रेमसंबंध तोडण्यासाठी अखलाक खान यांनी कल्याण येथील एका मांत्रिकाकडे धाव घेत उपाय करण्यास सांगितले. काही विटा नवी मुंबईमधील विहिरीत टाकल्यानंतर खान मुरुडच्या चोरढे गावात आले होते.
काही काळ तणावाचे वातावरण
अखलाक खान हा रविवारी या विटा ताडगाव येथील विहिरीत टाकत असताना काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत त्यांना जाब विचारला. त्यावर अखलाखने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पाण्यात विष कालवल्याचा संशय सर्वांना आला. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक विहिरीजवळ जमा झाले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी खान याला विहिरीतील पाणी पिण्यास सांगितले. त्याने पाणी पिण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला. अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अन् सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला
पोलिसांनी अखलाक खान याची विचारपूस केल्यावर मुरुड तालुक्यातील मजगाव येथील जावई असल्याची त्याने माहिती देत चोरडे येथे एका लग्न समारंभासाठी आल्याचे सांगितले. आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण तोडण्याकरिता एका मांत्रिकाने दिलेल्या विटा या विहिरीत टाकल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी अखलाकला विहिरीतील पाणी पिण्यास सांगितले व स्वतः पाणी प्यायले. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत मुरुड पोलीस ठाण्यात या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.