
मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या गिटहबने हिंदुस्थानातील 142 लोकांना कामावरून काढून टाकले आहे, ज्यात त्यांच्या अभियांत्रिकी विभागातील संपूर्ण तंत्रज्ञ कर्मचार्यांचा समावेश आहे, अशी माहिती असलेल्या सूत्रांनी मंगळवारी दिली.
कंपनीतून काढून टाकण्यात आलेले तंत्रज्ञ बेंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली येथील कार्यालयांमध्ये कार्यरत होते अशी माहिती देखील मिळत आहे.
संपर्क साधला असता, गिटहबच्या प्रवक्त्याने सांगितले की हा निर्णय कंपनीच्या पुनर्रचना योजनेचा एक भाग आहे.
‘फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या पुनर्रचना योजनेचा हा एक भाग आहे. हा निर्णय कठीण आणि कठोर आहे याची कल्पना असली तरी आवश्यक असा निर्णय असल्याचं ते म्हणाले. कंपनीचा व्यवसाय आणि भविष्य लक्षात घेत पुनर्संरचनेचा भाग म्हणून मंगळवारी कर्मचारी कपात करण्यात आली’, असं प्रवक्त्यानं सांगितलं.
प्रवक्त्यानं पुढे सांगितलं की कंपनीचे लक्ष हे आहे की GitHub हे विकासक आणि ग्राहकांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजंस (AI) द्वारे समर्थित पूर्ण-एकत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आहे.
‘या फोकससह, आम्ही काही व्यवसाय ऑपरेशन्स एकत्रित करत आहोत, त्यापैकी काही हिंदुस्थानात आधारित आहेत. आम्ही हिंदुस्थानी बाजारपेठेत सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि हे बदल आमच्या ग्राहकांवर आणि लोकांवर परिणाम करणार नाहीत’, असा विश्वासही प्रवक्त्याने व्यक्त केला.
मायक्रोसॉफ्टने जानेवारीमध्ये जाहीर केले होते की, ती आपल्या खर्चाची बचत करण्याच्या उद्देशाने आणि कंपनीला दीर्घकाळ कार्यरत ठेवण्याच्या दृष्टीनं सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करेल.
मायक्रोसॉफ्टने 2 जून 2018 रोजी स्टॉक डीलमध्ये USD 7.5 बिलियन मध्ये GitHub विकत घेतले.



























































