
सामना प्रतिनिधी । उल्हासनगर
लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला एकही जागा सोडलेली नाही, याचे मला प्रचंड दुःख वाटते. तरीदेखील आम्ही शिवसेना-भाजप युतीसोबतच असल्याची ग्वाही केंद्रीय समाजकल्याण मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज दिली. बहुजन वंचित आघाडीच्या मतविभागणीचा फायदा हा युतीलाच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उल्हासनगरात प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, आम्ही ज्यांना साथ दिली तो पक्ष सत्तेवर आला हा इतिहास आहे. काँग्रेसने माझ्या दिल्लीच्या बंगल्यातील सामान बाहेर रस्त्यावर फेकले होते हे कसे विसरणार? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्तीची हाक दिल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांशी चर्चा केल्यानंतरच शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा निर्णय आरपीआयने घेतला. याही निवडणुकीत आम्ही युतीलाच साथ देणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.























































