मोदीजी, मला सुसाईड बॉम्ब द्या; मी पाकिस्तानला जाईल अन्… कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद खान यांचं विधान चर्चेत

जम्मू-कश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. अशातच कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांनी एक मोठे विधान केले आहे. यामुळे ते सध्या चर्चेत आहेत.

कर्नाटकचे मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, पाकिस्तान हा हिंदुस्थानचा कायमच शत्रू राहिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परवानगी दिली तर आपण पाकिस्तानमध्ये युद्धाला जायला तयार आहोत.

आपण भारतीय आहोत, आपण हिंदुस्थानी आहोत. पाकिस्तानचे आपल्यासोबत कधीही कसलेही संबंध राहिलेले नाहीत. पाकिस्तान कायमच आपला शत्रू राहिलेला आहे. जर मोदी, अमित शहा आणि केंद्र सरकारने मला परवानगी दिली तर मी पाकिस्तानमध्ये जाऊन युद्ध करण्यास तयार आहे, असे जमीर अहमद खान म्हणाले.

जमीर अहमद खान यांनी मोदी आणि शहा यांच्याकडे सुसाईड बॉम्ब देण्याची मागणीही केली. मी युद्धासाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार आहे. मोदी, शहा यांनी मला सुसाईड बॉम्ब द्यावा. मी तो माझ्या शरीरावर बांधघून पाकिस्तानमध्ये जाईन आणि हल्ला करेन, असेही ते म्हणाले.

युद्ध झाले तर मी तयार आहे. मी पाकिस्तानसोबत युद्धास तयार आहे. मी स्वत: मैदानात उतरून हिंदुस्थानकडून युद्ध करेन. गरज पडली तर आत्मघाती हल्लाही करेन. मी चेष्टा कर नाही. देशासाठी मी सुसाईड बॉम्ब अंगाला लावून पाकिस्तानला जाईन आणि हल्ला करेन, असेही ते म्हणाले.