
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार, गोवा राज्याचे प्रभारी संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज केली.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेवढय़ा जागांवर आम्ही उभे राहू तेवढय़ा जागा जिंकू, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी या वेळी व्यक्त केला. गोव्यात आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ‘आयाराम गयाराम’ ही कल्पना आता हरयाणानंतर गोव्यातही दिसत आहे. गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही इतके घाणेरडे राजकारण सुरू आहे. अशा राजकारणाचा व गोव्यातील राजकीय पक्षांचा लोकांना कंटाळा आला आहे. महाराष्ट्रातील सरकार पाहून येथील लोक आम्हाला संधी देतील, असा विश्वासही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
उत्पल पर्रीकर यांचा विषय हा भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे. मनोहर पर्रीकर हे गोव्याचे महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे लोकांची भावना आहे की, त्यांच्या मुलाला तिकीट मिळावे असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दादरा-नगर-हवेलीच्या निवडणुकीत तीन वेळा पराभव झाल्यावर आम्ही चौथ्यांदा जिंकलो, गोव्यात आम्ही युतीच्या माध्यमातून लढलो. त्या वेळी आमच्या वाटय़ाला दुर्दैवाने अशा जागा आल्या जिथे शिवसेनेचे काम नव्हते. या वेळी आम्ही दहापेक्षा अधिक जागांवर लढत आहोत. त्यातून आम्हाला नक्कीच यश मिळेल, असे संजय राऊत म्हणाले.
पहिली यादी लवकरच
गोव्याची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याची ‘ऑफर’ आम्ही काँग्रेसला दिली होती, पण त्यांनी हो किंवा नाही म्हटले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रपणे गोव्यात निवडणूक लढेल. उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होऊ शकते. त्यानंतर इतर याद्या जाहीर होऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.




























































