
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर विदेशी महिलांना टवाळखोरांकडून होणारा वाढता त्रास लक्षात घेता पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. गोव्यात विदेशी अथवा देशी पर्यटकांचा आता त्यांच्या परवानगीशिवाय फोटो किंवा सेल्फी काढता येणार नाही. पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास अशा हुल्लडबाजांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतले जाणार आहे.
गेल्या आठवड्यात उत्तर गोव्यातील बागा बीचवर विदेशी पर्यटकांना फोटोसाठी त्रास देण्यात आला. विदेशी महिला पर्यटकांनी परवानगी दिली नसताना त्यांना फोटो, सेल्फीसाठी आग्रह धरण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 170 अंतर्गत चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले. कळंगूटमध्ये विदेशी पर्यटक महिला समुद्रात आंघोळ करत असताना तिचे चित्रीकरण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. संशयित अलिस्टो लोबो याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले होते. अशा घटनांना आळा घालावा म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.


























































