गोव्यात कुणी सोबत आले नाही तरी शिवसेना स्वबळावर लढेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही आघाडी व्हावी यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले. कॉँग्रेसबरोबर चर्चा केली, परंतु त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. गोव्यात कुणी सोबत आले नाही तरी स्वबळावर 14 ते 15 जागा लढविण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन-तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा विधानसभेच्या निवडणुकीबाबत काँग्रेसबरोबर आमची काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातली काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे. पण ठीक आहे, त्यांना जसं तरंगायचं तसं तरंगू द्या. जेव्हा तडाखे बसतील तेव्हा त्यांना जाग येईल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी कॉँग्रेसला दिला. गोव्यात शिवसेना स्वतंत्र लढेल. शिवसेना इथे पहिल्यांदा निवडणूक लढवत नाहीये. प्रत्येक निवडणुकीवेळी शिवसेनेची ताकद येथे  वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप ज्यावेळी पहिल्यांदा गोव्यात निवडणूक लढला होता त्यावेळी त्यांचीही परिस्थिती चांगली नव्हती. तेव्हा भाजप हा फक्त 13 जागांवर लढला होता. त्यावेळी सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. राजकारणात हे होतच असते. भाजपचे एकदा लोकसभेत 360 उमेदवारांचे डिपॉझिट गेले होते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बहुसंख्य लोकांचे डिपॉझिट गेले आहे म्हणून लढायचे नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

राष्ट्रवादीसोबत चर्चा

काँग्रेसने आम्हाला काही जागा देण्याचा प्रयत्न केला. दोन किंवा तीन जागा ते आम्हाला देत होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन गोव्यात निवडणूक लढवू. साधारण दोन ते तीन दिवसांत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे गोव्यात येतील. त्यांच्याशी चर्चा करून आमच्या जागा जाहीर करू, असे संजय राऊत यांनी सांगितले.

पह्डा–झोडा व राज्य करा ही भाजपची नीती

गोव्यात भाजप आहे, कुठे? कधीही स्वबळावर त्यांचे इथे सरकार आले नाही. मनोहर पर्रीकर होते तेव्हाही. बहुमताच्या आसपास येऊन थांबलेले आहेत आणि मग याचे-त्याचे विकत घे, याचे-त्याचे आमदार पह्ड, पह्डा-झोडा व राज्य करा ही भाजपची गोव्यातील नीती आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

गोव्यात ठाकरे सरकारचा प्रभाव

गोव्यात शिवसेना रुजते आणि रुजली आहे. गोव्यात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा प्रभाव आहे. शिवसेनेचे लोक तिथे काम करत आहेत. गोव्यात आजवर जे प्रस्थापित लोक आहेत तेच दहा-बारा जण कधी या पक्षात, तर कधी त्या पक्षात राहून राजकारण करतात. सामान्य माणसाला इथे संधीच नाही. शिवसेना सामान्यातील सामान्य माणसाला उमेदवारी देऊन निवडणुका लढणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

उत्पल पर्रीकरांनी हिंमत दाखवावी

उत्पल पर्रीकर यांच्याबाबतीत जे भाजप वागतेय हे गोव्याच्या जनतेला काही आवडलेले नाही. पण शेवटी निर्णय उत्पल पर्रीकरांनी घ्यायचा असून त्यांनी हिंमत दाखवावी. शिवसेना सर्वतोपरी मदत करेल. मनोहर पर्रीकर हे राजकीय पक्षाच्या किंवा राजकारणाच्याही पलीकडचे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर जर अन्याय होत असेल आणि ते धाडसाने पुढे येऊन काही करणार असतील तर शिवसेनाच कशाला इतर राजकीय पक्षही त्यांना मदत करतील असे संजय राऊत म्हणाले.