
सामना प्रतिनिधी। पणजी
गेल्या पाच दिवसांपासून गोव्यात पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यातील नद्या, नाल्यांना पूर आलेला आहे. गेले 96 तास पाऊस सतत कोसळतच आहे. राज्यातील सर्व धरणे तुडूंब भरली आहेत. मुसळधार पावसामुळे नद्यांतील पाण्याचा स्तर वाढल्याने सर्व शेते पाण्याखाली गेली आहेत. पणजीत तर आतापर्यंत तब्बल 91 इंच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. पुढील दोन दिवस देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने राज्यातील सखल भागातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.
राजधानी पणजीत गेल्या 24 तासात 5 इंच व दिवसभरात 3 इंच मिळून 8 इंच पाऊस कोसळलेला आहे. पणजी – सांताक्रूझ रस्त्यावर गेले दोन दिवस पावसाचे पाणी तुंबले असून दोन्ही बाजूची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. ताळगावातही शेतजमीन पाण्याखाली गेल्यानंतर आजूबाजूच्या रस्त्यांवरही पाणी तुंबल्याचे चित्र पहायला मिळाले. पणजीत सात ईनेज परिसरातील झोपडयांमध्ये
पाणी शिरले होते.
डिचोली व साखळी येथील वाळवंटी नद्यांनी अक्रमक रुप धारण केले आहे. साखळी वाळवंटी नदीच्या पाण्याने 4.8 मीटर पाण्याची पातळी गाठली आहे. साखळीत बंदर भागातील घरांना या पुरामुळे धोका निर्माण झाला आहे. साखळी संरक्षण भिंतीच्या अलिकडे मैदानात पाण्याचे प्रमाण वाढल्याने साखळी बाजारापर्यंत पाणी पोहोचले. जलस्रोत खात्याच्या दोन मोठया पंप हाऊसमधून पाणी खेचून वाळवंटीमध्ये सोडण्यात येत होते.
होंडा येथील नदीला आलेल्या पुरामुळे साखळी – वाळपई हमरस्त्यावर अडीच फूट पाणी होते. होंडा परिसरातील बराच रस्ता पुरामुळे पाण्याखाली गेला. सायंकाळी उशिरा पूर ओसरला. गावठण, कुडणे, न्हावेली, आमोणे व विर्डी या भागातील शेतजमीन गेले दोन दिवस पुरामुळे पाण्याखाली गेलेली आहे.
सत्तरीमध्ये म्हादई नदीला महापूर आला असून त्याचा परिणाम म्हणून नदीच्या दोन्ही बाजूची कुळागरे शेतजमीन पाण्याखाली गेली. दरम्यान, म्हादईच्या पुराच्या पाण्याचा फटका सोनाळ भागात बसला असून सोनाळातून गावाबाहेर जाणारे दोन्ही रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकच बंद झाली होती.
अंजुणे धरण परिसरात यंदाच्या मोसमात आतापर्यंत 121 इंच एवढा विक्रमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे 92.80 मीटर क्षमता असलेले धरण तुडूंब भरले आहे. जलस्रोत खात्याने धरणाचे चारही दरवाजे उघडल्याने दर सेकंदाला धरणातून 29.61 क्युमेक्स पाणी सोडले जाते व 28.40 क्युमेक्स पाणी धरण क्षेत्रात येत असल्याचे सांगितले जात आहे.
साखळीतील पंपहाऊस रविवारी रात्री 12 वाजता सुरु केलेले सोमवारी रात्री उशिरापर्यंत ते चालूच होते. त्यातून साखळी बाजारात येणारे पाणी संरक्षण भिंतीच्या पलिकडे वाळवंटीत सोडले जात आहे.
गेल्या 24 तासात साखळी व जुने गोवेमध्ये प्रत्येकी 7 इंच, पणजीत 8 इंच, वाळपई 5.5 इंच, फोंडा, म्हापसा व मडगाव येथे प्रत्येकी 3.5 इंच, केपे व सांगे येथे प्रत्येकी 5 इंच तर दाबोळीत 4.5 इंच व मुरगावात 5.5 इंच एवढी पावसाची नोंद झाली. सत्तरीत 114 इंच पाऊस तर सांगेमध्ये 103 इंच पाऊस झाला आहे.आगामी दोन दिवस पावसाचे प्रमाण हे असेच राहाणार असून सर्वत्र मुसळधार व वादळी वाऱ्यासह तो कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सत्तरी तालुक्यात म्हादई नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे सोनाळ ते वाळपई दरम्यानच्या रस्त्यावर पाणी आले. सोनाळ गावाचा वाळपई शहरापासून सुमारे चार तास संपर्क तुटला होता. वाळपई ते होंडा दरम्यानच्या गांजे याठिकाणी म्हादईचेच पाणी रस्त्यावर आल्यामुळे जवळपास सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. वेळूस येथील नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे सभोवतालच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास केरी पंचायत क्षेत्रातील गावसवाडा येथे चक्रीवादळाचा फटका बसला.त्यात दोन घरांचे नुकसान झाले.
निरंकाल व दाभाळ गावामधून वाहणाऱ्या उण्णय नदीला पूर आला. त्यामुळे निरंकाल भागातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने निरंकाल-दाभाळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.
शनिवारपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शिरोडा व बोरी भागातील नदी नाले दुथडी वाहत असल्याने बऱ्याच ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शिडोटे- शिरोडा येथील बंधाऱ्याला भगदाड पडल्याने मोठयाप्रमाणात शेती खाऱ्या पाण्याखाली गेली आहे.
पारोडा – केपे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे मडगाव – केपे मार्गावरील सर्व वाहतूक सोमवारी चांदरमार्गे वळविण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी पाण्याची पातळी आणखी वर आली होती. पारोडा येथील केपे – मडगाव मुख्य रस्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. कुशावती नदीवर असलेला पारोडा पुलही पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. यंदाच्या मोसमात पारोडा पूल पाण्याखाली जाण्याची ही तिसरी वेळ आहे.
तिसवाडी तालुक्यातील पाळे-शिरदोन येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
धारबांदोडा तालुक्यातील दावकोण व कोडली गावामधून वाहणाऱ्या दूधसागर नदीला सोमवारी सकाळी पूर आला. नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने काठावर वसलेल्या दावकोण गावापर्यंत पाणी पोचले होते. पाण्याची पातळी वाढू लागल्याने गावातील काही घरांना धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काणकोण तालुक्यातील गालजीबाग, तळपण, साळेरी नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे.





























































