
कोरोना संकटामुळे परीक्षा रद्द कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन कसे करायचे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. गोवा येथील आयआयटी संस्थेने त्यासाठी अभिनव पद्धत शोधून काढली आहे. परीक्षेचा पेपर विद्यार्थ्यांनीच काढायचा आणि त्यांनीच तो सोडवायचा अशी ही पद्धत आहे.
विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिकवण्यात आलेल्या 30 लेक्चर्सच्या आधारावर 60 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करावी, असे आयआयटी गोवाने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले आहे. ही प्रश्नपत्रिका दोन तासांमध्ये सोडवता येईल, अशी असावी. प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्याला आतापर्यंत शिकवलेला अभ्यासक्रम कितपत समजला हे अधोरेखित व्हायला हवे. तसेच इतर कोणत्याही विद्यार्थ्याशी प्रश्नपत्रिकेबाबत चर्चा करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेत समानता आढळली तर त्यांचे गुण वजा केले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. पहिल्या भागात प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी 30 गुण ठेवण्यात आले आहेत.

























































