जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपचे 18 उमेदवार जाहीर

458

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या निवडणूकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात उत्तर गोव्यातील 14 तर दक्षिण गोव्यातील 4 उमेदवारांचा समावेश आहे. 6 विद्यमान सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.

जिल्हा पंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य निवडणूक समितीची बैठक भाजप मुख्यालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे,राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस दामू नाईक, नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर उपस्थित होते.

बैठकी नंतर प्रदेसाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उत्तर गोव्यातून 14 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.त्यात अनंत गडेकर(हरमल),धनंजय शेटगावकर(मोरजी),मनोहर धारगळकर(धारगळ),सीमा खडपे(तोरसे),सानिशा तोरसकर(शिवोली),मनीषा नाईक(हळदोणे),निहारिका मांद्रेकर(हणजुणे),दत्तप्रसाद दाभोलकर(कळंगुट),महेश सावंत(,कारापुर-सर्वण),शंकर चोडणकर(मये),गोपाळ सुर्लकर(पाळी),सगुण वाडकर(होंडा),देवयानी गावस(केरी),राजश्री काळे(नगरगाव) यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यातून फक्त चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये उमाकांत गावडे(उसगाव-गांजे),उल्हास तूयेकर(दवर्ली),खुशाली वेळीप(बार्से),शाणू वेळीप(खोला) यांचा समावेश आहे.

भाजप 50 जागांवर निवडणूक लढवणार असून दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची बहुमताने सत्ता येईल,असा दावा यावेळी तानावडे यांनी केला. तानावडे यांनी काँग्रेस विधीमंडळ गट आणि प्रदेश कार्यकारिणीत एकमत नसल्याचे निदर्शनास आणून देत भाजपवर आरोप करण्यापेक्षा काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला.

आपली प्रतिक्रिया द्या