
गोव्याच्या पर्यटन विभागाने माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याला नोटीस पाठवली आहे. युवराज सिंह याने गोव्यातील मोरजिम भागात एक बंगला विकत घेतला आहे. पर्यटन विभागाच्या परवानगीशिवाय आणि नोंदणीशिवाय त्याने तो भाड्याने द्यायला सुरूवात केली असल्याचा आरोप आहे. याच कारणासाठी त्याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पर्यटन विभागाने युवराज सिंह 8 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. गोवा पर्यटन व्यापार कायदा 1982 च्या अन्वये गोव्यामध्ये कोणतीही जागा पर्यटन विभागाकडे नोंदणी केल्याशिवाय राहण्यासाठी भाड्याने दिली जाऊ शकत नाही. यामुळेच युवराज सिंह याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
गोवा पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी 18 नोव्हेंबरला ही नोटीस जारी केली आहे. ‘कासा सिंह’ असं युवराज सिंहच्या बंगल्याचे नाव असून त्याच्या या बंगल्यावर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोंदणी केल्याशिवाय आणि परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही हा बंगला भाड्याने दिल्याबद्दल तुमच्याविरोधात दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न या नोटीसद्वारे युवराज सिंह याला विचारण्यात आला आहे. युवराज सिंह याचा हा बंगला भाड्याने राहण्यासाठी दिला जात असून त्याची ऑनलाईन पद्धतीने देखील नोंदणी केली जात असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. नोटीसमध्ये युवराज सिंह याने केलेल्या एका ट्विटचाही हवाला देण्यात आला आहे. युवराजने ट्विट करत गोव्यातील आपला व्हिला भाड्याने देण्यासाठी उपलब्ध असल्याचं म्हटलं होतं. 8 डिसेंबरपर्यंत उत्तर मिळाले नाही तर तुमच्याविरोधातील आरोप खरे मानण्यात येतील आणि तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो असं नोटीसमध्ये म्हटले आहे.

























































