
सामना ऑनलाईन । पाटोदा
एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना बीडमधल्या पाटोदा तालुक्यात उघडकीस आली आहे. पाटोदा तालुक्यातील रायमोह येथील डोळ्याच्या वाडीत राहणाऱ्या शेतकऱ्याला मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी दिवसाढवळ्या दमदाटी करून त्याचा बोकड पळवला. मात्र हे चोरटे बोकड शिजवून पार्टीच्या तयारीत असतांनाच पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. त्यामुळे पाटोद्यामध्ये दिवसभर या बोकडचोरांचीच चर्चा सुरु होती.
रायमोह येथील डोळ्याच्या वाडीत राहणारे बबन सोले (65) हा वयोवृद्ध शेतकरी शुक्रवारी आपल्या 11 शेळ्या व इतर जनावरे घेऊन गांवदरा परीसरात चारण्यासाठी गेले होते. दुपार एक वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी सोले यांना धमकावत त्यांच्याकडील मोबाईल , काही पैसे व एक बोकड घेऊन पोबारा केला. यावेळी सोले यांनी आरडा ओरड करत आपल्या मुलांना बोलावले, मात्र तोपर्यंत बोकडचोर फरार झाले होते.
पीडित बबन सोले यांनी सांगितलेल्या वर्णनानूसार त्याच्या मुलांनी शोध घेतला असता बऱ्याच अंतरावर हातात मटन घेऊन जाणारा एका संशयिताला त्यांनी पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उप निरिक्षक अरुण डोंगरे व कर्मचाऱ्यांनी इतरांनी सदर संशयिताकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र उरलेले दोघे बोकडचोरांचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान होते.
पकडलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि रात्री ११ च्या सुमारास अत्यंत शिताफीने दोघांना जेरबंद केले, या वेळी डोंगराच्या पायथ्याशी एका गोठयात हे दोघे चोरलेल्या बोकडाचे मटन शिजवत पार्टीची तयारी करत होते. पोलिसांनी आयत्यावेळी धाड टाकल्याने दोघांच्या पार्टीचा बेत फसला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सुभाष गायकवाड, संजय पवळ आणि ज्योती विघ्ने यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.




























































