
सामना प्रतिनिधी, मुंबई
स्थानिकांचा विरोध झुगारून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या बुलेट ट्रेनविरोधात मुंबईतील बडय़ा उद्योगपतींनी दंड थोपटले आहेत. विक्रोळीतील मोक्याची जागा बुलेट ट्रेनमुळे बाधित होणार असल्याने घरे उभारणाऱ्या गोदरेज कंपनीने हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. ३१ जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असून कोर्टकचेरीमुळे केंद्र सरकारची बुलेट ट्रेन अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
५०८ कि.मी. लांबीच्या या प्रकल्पासाठी सरकारला गोदरेज कंपनीच्या ताब्यात असलेली विक्रोळी येथील ८.६ एकर जमीन आवश्यक आहे. या जमिनीखाली बुलेट ट्रेनच्या व्हेंटिलेशनसाठी डक्ट उभारण्यात येणार असून जागा ताब्यात मिळावी म्हणून प्रशासनाने गोदरेज कंपनीकडे तगादा लावला आहे. गोदरेज कंपनीने त्यास विरोध करून याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यात यावा अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. याप्रकरणी ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.



























































