शुक्रवारपासून गोकुळच्या दूध दरात 3 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोकुळ महासंघाने मुंबई आणि पुणे या शहरांसाठी म्हशीच्या दुधात तीन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता गोकुळचं दूध 69 रुपये प्रति लीटर इतकं झालं आहे. या मागे यूक्रेन युद्धामुळे झालेली तूट हे प्रमुख कारण आहे.

शुक्रवारपासून नवीन दर लागू होणार आहेत. अर्थात गोकुळचं गायीचं दूध मात्र पूर्वीच्याच दराने मिळणार आहे. गेल्या दीड वर्षात सहा वेळा अशी दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांच्या तुलनेने गोकुळचं दूध नऊ रुपयांनी वाढलं आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ डेअरी)ने यामागे यूक्रेन युद्धाचं कारण दिलं आहे. गोकुळ डेअरी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 13.05 लाख लीटर तर इतर भागांतून 2 लाख लीटर असं एकूण 15 लाख लीटर दूध जमा करते. त्याच्या वितरणामध्ये 10 लाख लीटर इतका मोठा भाग मुंबईत विकला जातो. या एकूण उत्पादनापैकी 70 टक्के दूध हे म्हशीचं दूध असतं.

सध्या सुरू असलेल्या यूक्रेन रशिया युद्धाचा परिणाम थेट दूध उत्पादनावर पडला आहे. अनेक दूध उत्पादक देशांमध्ये प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दुधाच्या पावडरीची मागणी वाढत आहे. ती मागणी पुरवण्यासाठी अधिक उत्पादन होणं गरजेचं आहे. तसंच उत्पादकांनाही त्याचा मोबदला देणं गरजेचं आहे. या सर्व प्रक्रियेतील तूट भरून काढण्यासाठी दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोकुळ डेअरीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली आहे.