
दिवाळी आणि सणासुदीनिमित्ताने तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सोन्याचा दरात आज मोठी घसरण झाली असून 10 ग्रॅमचा दर (1 तोळा) 51 हजारांच्याही खाली आला आहे.
सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रति तोळा 662 रुपये कमी झाला. नवीन दरानुसार आता 10 ग्रॅमसाठी 50 हजार 338 रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्यासह चांदीतही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. किलोमागे चांदी 1400 रुपये स्वस्त झाली असून नवीन दर 62 हजार 217 रुपये झाला आहे.

गेल्या आठवड्यात नोंदवली तेजी
फेस्टिव्ह सीझनमध्ये सोने-चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात भावात तेजी नोंदवण्यात आली होती. सोमवारी 50 हजार 500 रुपये असलेला दर शुक्रवारी 52 हजार 240 रुपये झाला होता. तर चांदीचा भाव देखील 60 हजार 383 रुपयांवरून 65 हजार 277 रुपयांवर जाऊन पोहोचला होता.

सोने 5800, तर चांदी 15,600 रुपयांनी स्वस्त
ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीचे दर रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. 7 ऑगस्टला 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपये, तर 1 किलो चांदीचा दर 77,840 रुपये झाला होता. मात्र गेल्या 3 महिन्यात सोने 5,800 तर चांदी 15,600 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोने महाग होणार की स्वस्त?
गेल्या 2 महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोने स्वस्त झाले आहे. सध्या 1 डॉलरचा दर 73-74 रुपये आहे. मात्र आगामी काही काळात डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला तर मात्र सोन्याचा दर 60 ते 70 हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे.


























































