
कोरोना प्रादुर्भावाने गेले 14 महिने विविध प्रकारच्या निर्बंधामुळे सराफा बाजार जवळजवळ बंदच आहे. वर्षभर कसेबसे तग धरून राहिलेले हे हातावर पोट असलेले कारागीर दुसऱया लाटेत संपूर्ण नेस्तनाबूत होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने 15 मेपर्यंत कडक निर्बंध वाढविल्याने या वर्षीचा लग्नसराईचा मोसम पुन्हा वाया गेल्यात जमा आहे. त्यामुळे रिक्षाचालक, बांधकाम मजुरांप्रमाणे सुवर्ण कारागीरांनादेखील आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना महाराष्ट्र सुवर्णकार सेनेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
राज्यातील लाखो सुवर्णकारागीरांना बेरोजगारीच्या काळातही वीज बिले, घरभाडे, घरखर्च, मुलांच्या शाळेची फी हा सर्व खर्च निभावणे कठीण जात आहे. हातावर पोट असलेल्या या घटकाची नोंदणी किंवा मोठे संघटन अस्तित्वात नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून सुवर्ण कारागीरांना आर्थिक मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे विश्वस्त शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपाध्यक्ष दिवाकर भटकळ, खजिनदार संतोष मुरकुटे, अध्यक्ष माजी शाखाप्रमुख प्रवीण जुवाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. यावेळी युवा अधिकारी विराज वेदपाठक, सुवर्णकार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




























































