सोने व्यापारी किर्तीकुमार कोठारींचा रत्नागिरीत खून, मृतदेह गोणीत भरून आबलोलीत टाकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील प्रसिद्ध सोने – चांदी व्यापारी कीर्तीकुमार कोठारी रत्नागिरी बाजारातून गूढ रित्या गायब झाले होते. रत्नागिरीत व्यापारासाठी आले असताना ते सोमवारी रात्री पासून गायब झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. आता त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोठारी यांचा खून करून मृतदेह गोणीत भरून आबलोली येथे टाकण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून व्यवसायिक कामासाठी रत्नागिरीत आलेले सोने चांदीचे व्यापारी कीर्तिकुमार कोठारी( वय 55) हे राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले होते. कीर्तिकुमार हे मीरा भाईंदर येथील असून ते रत्नागिरीत ज्वेलर्स च्या दुकानात आपला सोने चांदीचा माल विकण्यास येतात. नेहमीप्रामाणे ते रत्नागिरीत आले होते. त्यांनी आपला मुक्काम आठवडा बजार येथील एका लॉज मध्ये केला होता.

सोमवारी रात्री ते एम जी रोड येथील एका ज्वेलर्स कडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सिसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. मात्र त्यानंतर त्यांचा माग काढता येत नव्हता. यासाठी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम चालू होते. त्यांच्याजवळ सुमारे 10 लाखांचे दागिने होते अशी देखील चर्चा होती. आता कोठारी यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. त्यांचा मृतदेह आबलोली येथे गोणीत भरलेल्या अवस्थेत सापडला आहे.