
मसुरे व नांदोस (कट्टा) येथे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचा बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी बिहार येथील दोन सख्ख्या भावांसह पसार झालेल्या अन्य एका संशयिताविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.
मालवण तालुक्यातील मसुरे व नांदोस (कट्टा) येथे मंगळवारी सोन्याचे दागिने पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या दोघा बिहारी बाबूंना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना गजाआड करण्यात यश आले. मसुरेतील जयश्री रमेश राणे या वृद्ध दाम्पत्याला दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या बिरेंद्रकुमार ओमप्रकाश साहा (वय 24) याला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या समवेत असलेल्या दुसरा चोरटा सोन्याची बांगडी घेऊन पसार झाल्याने पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे, हवालदार प्रमोद नाईक, विवेक फरांदे, हरी जायभाय करत आहे.
नांदोस बांधवाडी येथील घनश्याम नांदोसकर यांनाही दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसविल्याप्रकरणी योगेश ओमप्रकाश साहा (वय 26) या चोरट्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मसुरे आणि नांदोस येथील चोरटे नात्याने सख्ख्ये भाऊ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. योगेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेत असलेल्या बिरेंद्रकुमार आणि योगेश याला मालवण न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार रुक्मांगत मुंडे, योगेश सराफदार हे करीत आहेत.
राजापूरमध्येही फसवणूक
पोलीस कोठडीत असलेल्या मसुरे फसवणूक प्रकरणातील संशयित बिरेंद्रकुमार साहा याने राजापूरमध्ये दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलांना फसविल्याचा प्रकार समोर आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलीस व चोरट्या विरोधात तक्रार देणारी महिला मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या महिलेने संशयिताला ओळखले असल्याचे समजते.





























































