हॉलमार्कचा ‘झोलमार्क’, ठाण्यात गोल्ड प्लेटेड दागिने विकणाऱया ठगाला बेडय़ा

1043

सोन्याच्या दागदागिन्यांवर ‘916 हॉलमार्क’ व ‘22 कॅरेट’ असा शिक्का असलेले गोल्ड प्लेटेड बनावट दागिने सोनारांना विकणाऱ्या ठगाला ठाण्यात बेडय़ा ठोकण्यात आल्या. राकेश बागला (34) असे या भामट्याचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशातून बनावट दागिने सप्लाय करणाऱ्या शिवमपुमार सोनी (20) याला देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गोल्ड प्लेटेड बनावट चार सोनसाखळ्या, 12 अंगठय़ा, सात कानातले झुमके पोलिसांनी जप्त केले आहेत. ‘हॉलमार्क’च्या या ‘झोलमार्क’ने सोनारांना घाम फुटला आहे.

जांभळी नाका येथील टॉवर नाका भागात राकेश पुनामिया यांचे सोन्याचांदीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात विक्रांत ठक्कर असे नाव सांगून एकाने 29 ग्रॅम वजनाची हॉलमार्क चिन्ह असलेली सोन्याची चेन गहाण ठेवली. त्याबदल्यात साठ हजार रुपये घेतले. मात्र काही वेळाने सोनार पुनामिया यांना ही चेन गोल्ड प्लेटेड असल्याचे समजले. त्यांनी पोलिसात याबाबत तक्रार देताच ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंत यांच्या टीमने तपास करून राकेश बागला याला अटक केली. मूळचा पंजाब येथे राहणारा राकेश सध्या मीरा रोड येथे राहात होता. त्याला युपीमधून दागिने पाठवणाऱया शिवकुमारलाही पोलिसांनी अटक केली. ही कार्यपद्धती वापरत या जोडगोळीने पुणे, नागपाडा, पंजाब या ठिकाणी ज्वेलर्सची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या