महागडा दसरा; सोने खरेदीदारांचा निरुत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे दसऱयाच्या दिवशीचा सोन्याचा दर महत्त्वाचा असतो. मंगळवारी सोन्याचा दर प्रतितोळा 39 हजार  300 रुपये इतका जास्त राहिल्याने खरेदीवर त्याचा परिणाम दिसून आला. दसऱयाच्या मुहूर्तावरील सोने खरेदी गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे.

नोव्हेंबरपासून सुरू होणारी लगीनसराई लक्षात घेता ग्राहकांनी मोठय़ा दागिन्यांचे ऑर्डर बुकिंग आजचा मुहूर्त साधून केले, मात्र दर जास्त असल्याने छोटय़ा दागिन्यांची खरेदी काहीशी पुढे ढकलणे पसंत केले.  बहुतेक ग्राहकांनी बांगडय़ा, मंगळसूत्र, हार अशा मोठय़ा दागिन्यांची बुकिंग केल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली तर  सोने खरेदी अंदाजे 10 टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘जेम्स ऍण्ड ज्वेलरी कौन्सिल’चे संचालक आशीष पेठे यांनी सांगितले.

वाहन खरेदीकडे पाठ 

मुंबईतील ताडदेव व वडाळा या दोन्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये दसऱयाच्या मुहूर्तावर झालेली वाहनांची नोंदणी गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती आहे. प्रादेशिक परिवहनच्या वडाळा कार्यालयात गतवर्षी दसऱयाच्या मुहूर्तावर 199 नव्या वाहनांची नोंदणी झाली होती. याउलट या वर्षी केवळ 42 वाहनांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, ताडदेव आरटीओमधील वाहन नोंदणीत मात्र काही प्रमाणात वाढ दिसून आली. गेल्या वर्षी 33 वाहनांची नोंदणी झालेल्या ताडदेव आरटीओमध्ये आज 41 वाहनांची नोंदणी झाली होती.