सोन्याला पुन्हा झळाळी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सांगली

आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने 2019 हे वर्ष जानेवारीच्या सुरुवातीपासूनच तेजीचे संकेत देत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दराने चढता आलेख ठेवला आहे. 31 जानेवारी रोजी सोन्याने 150 रुपयांची वाढ नोंदवत 33,300 रुपयांपर्यंत पोहचला आहे. जीएसटीसह 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी 34,300 रुपये मोजावे लागत आहेत. हा दर येत्या काही दिवसांत 35000 रुपये ओलांडण्याची शक्यता सराफ बाजारातून व्यक्त केली जात आहे.

रुपयाच्या तुलनेत डॉलरचा दर वधारला आहे. त्याचप्रमाणे कच्चा तेलाचा दरही वधारला आहे. त्या दोन्ही बाजारांतील आर्थिक उलाढालीचा परिणाम सोने-चांदी दरावर झाला असल्याने जानेवारीत रोजच सोनेदरात किरकोळ वाढ होत होती. परंतु गुरुवारी सोनेदराने 34000 चा टप्पा ओलांडल्याने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी सोनेखरेदीला अधिक प्राधान्य दिले. 24 कॅरेट सोन्याचा दर 33,300 तर 22 कॅरेट सोन्याचा दर 31,140 रुपये आहे, तर चांदीने 41,000 चा टप्पा ओलांडला आहे. पुण्यात सोनेदर 33,900 तर दिल्लीत हा दर 34,000 रुपये आहे. त्यामध्ये 3 टक्के जीएसटी रक्कम मिळवली जाते. त्यामुळे तिथेही सोने दराने उच्चांक गाठला आहे. सोने दरात तेजी असल्याने ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी अजूनही लग्नाचे मुहूर्त सुरू असल्याने सोनेखरेदी चांगली होत आहे. सोने दर वाढू लागल्याने चोख सोन्याची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.

आगामी काळात डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी मजबूत झाला सोन्याचे दर खाली येऊ शकतात; परंतु सध्या देशात सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि ती आयातीच्या माध्यमातूनच पूर्ण केली जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणुकीचे माध्यम म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढते आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांत सोने दरात 770 रुपयांची वाढ झाली. चांदी दरात 350 रुपये दरवाढ झाली. चांदीसाठी इंडस्ट्रियल युनिट व नाणीनिर्मितीला अधिक मागणी आहे. अमेरिका, चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार कराचा परिणाम सोनेदरावर झाल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात पडसाद उमटत आहेत.