सहा वर्षांत प्रवाशांचे 8 कोटी 28 लाख रुपयांचे सोने चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शहरवासीयांची लाइफलाइन असलेल्या लोकलमधून चोरटय़ांनी गेल्या सहा वर्षांत प्रवाशांच्या 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपयांच्या सोन्याच्या वस्तू चोरल्याची माहिती समोर आली आहे तर पोलिसांनी तपास करून 3 कोटी 32 लाख 39 हजार 921 रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.

लाखो मुंबईकर हे दररोज लोकलने प्रवास करत असतात. हे चोरटे गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोने चोरतात. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी लोकलमध्ये होणाऱ्या चेन स्नॅचिंगबाबत माहिती रेल्वे पोलिसांकडे मागितली होती. त्यानुसार गेल्या सहा वर्षांत प्रवाशांचे 8 कोटी 28 लाख 24 हजार 399रुपयांचे सोने चोरीला गेले आहे. 2013 मध्ये सोने चोरीचे 62 गुन्हे नोंद असून 17 गुन्हय़ांची उकल पोलिसांनी केली तर 2014 मध्ये 73 गुन्हय़ांत 23 लाख 67 हजार 789 हजार रुपयांचे सोने चोरीला गेले आहे. 2017 मध्ये 1 कोटी 42 लाख 92 हजार 631 तर 2018 मध्ये 1 कोटी 49 लाख 27 हजार 222 रुपयांचे सोने चोरीला गेल्याची रेल्वे पोलिसांकडे नोंद आहे. पोलिसांनी 860 गुन्हय़ांची उकल करून 3 कोटी 32 लाख 39 हजार 921 रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.

दादर पोलिसांचे शिटी वाजवा अभियान
गर्दीच्या वेळेस प्रवाशांना ऍलर्ट करण्याकरिता दादर रेल्वे पोलिसांनी नवा फंडा शोधून काढला आहे. व्हिजिबल पोलिसिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त पोलीस गणवेशात रेल्वे स्थानक परिसरात गस्त करतात. गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकार होऊ नयेत म्हणून लोकल थांबल्यावर दोन पोलीस हे शिटी वाजवतात. शिटी वाजल्यामुळे येथे पोलीस असणार या भीतीने चोरटे तेथून पळ काढतात. परिणामी प्रवासी ऍलर्ट होतात असे दादर रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले.

पहिल्यांदाच चोरी करणाऱ्यांमध्ये बहुतांश युवक
रेल्वे पोलिसांनी चोरीच्या कित्येक गुह्यांत युवकांना अटक केली आहे. काही युवक हे पहिल्यांदाच चोरी करताना पकडले होते. त्यांची राहण्याची पद्धत आणि कपडय़ांचा पेहराव यामुळे त्यांच्यावर पोलिसांना संशय येत नाही. चिंतेची बाब म्हणजे हे चोरटे चोऱ्या करण्याकरिता परराज्यांतून मुंबईत येतात. लोकलमध्ये चोऱ्या करून ते परत आपल्या गावी निघून जातात. चोरलेले हे सोने ते 2-3 दिवसांत विकतात. त्यामुळे चोरटय़ांचा शोध घेऊन सोने जप्त करणे हे पोलिसांना अवघड असते.