
सामना प्रतिनिधी, मुंबई
चिंचपोकळी येथे राहणाऱ्या एका सोने व्यापाऱ्याला दोघांनी लुटल्याची घटना शनिवारी रात्री घडली. चिंचपोकळी स्टेशनबाहेर त्या व्यापाऱयाला गाठून दोघांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर व्यापाऱ्याकडील 1800 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून पसार झाले. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक सकारिया (57) हे सोने व्यापारी चिंचपोकळी येथे पत्नी व दोन मुलांसोबत राहतात. काळबादेवी येथे त्यांचा ‘जय आम्रपाली’ नावाचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. ऑर्डरनुसार सकारिया सोन्याचे दागिने बनवनू देतात. सकारिया शनिवारी कामानिमित्त पनवेलला गेले होते. तेथून ते रात्री पावणेदहाच्या सुमारास लोकलने चिंचपोकळी रेल्वे स्थानकात उतरले. तेथून घराच्या दिशेने जात असताना दोघांनी त्यांना रस्त्यात अडविले. मग दोघांनी त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. सकारिया यांनी त्यांना प्रतिकार सुरू करताच आरोपींनी त्यांच्याकडील चाकूने सकारिया यांच्यावर गंभीर वार केले. शरीरावर वार झाल्याने सकारिया यांच्या हातून सोन्याचे दागिने असलेली बॅग सुटली आणि ती घेऊन मग आरोपींनी पळ काढला. गंभीर जखमी असलेल्या सकारिया यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल केले आहे.
आठवडय़ातून दोन वेळा पनवेलला ये-जा
सकारिया आठवडय़ातून दोन वेळा कामानिमित्त पनवेलला ये-जा करीत असतात. ही बाब आरोपींनी हेरली होती. त्यानुसार कट रचून आरोपींनी सकारिया यांना शनिवारी चिंचपोकळी परिसरातील निर्जनथळी गाठून त्यांना लुटले. सकारिया यांच्या कामाची ज्यांना माहिती आहे त्यांनीच ही लुटमार केली असावी असा काळाचौकी पोलिसांना संशय आहे.





























































