
कबड्डी दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळय़ात कबड्डीच्या जुन्या आणि नव्या सोनेरी आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. मुसळधार पावसाच्या साक्षीने रंगलेल्या या सोहळय़ात जुने-नवे खेळाडू, कार्यकर्ते व कबड्डीप्रेमी एकत्र जमले. खेळाडू व नंतर पूर्ण आयुष्य संघटक म्हणून झटलेले कबड्डी महर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कबड्डी दिन सोहळय़ात कबड्डी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना वयोवृद्ध रामभाऊ घोडके यांना गहिवरून आले. यावेळी दै. ‘सामना’चे क्रीडा पत्रकार विठ्ठल देवकाते, कबड्डीसाठी आयुष्य वेचलेल्या शकुंतला खटावकर व ज्येष्ठ कबड्डीपटू चंद्रकांत काटे यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने पोयनाड येथील जय मंगल कार्यालय, पांडवा देवी येथे मुसळधार पावसातदेखील हा रौप्य महोत्सवी कबड्डी दिन उत्साहात पार पडला. कबड्डीतील दिग्गज जया शेट्टी (कृतज्ञता पुरस्कार), चंद्रकांत काटे, जीवन पैलकर, ज्ञानेश्वर कुंभार, कुमुद कागलकर, दिलीप देवलकर, नलिनी पवार (ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार) तर जे. जे. पाटील, प्रभाकर लकेश्री (श्रमयोगी पुरस्कार) हे पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या चेहऱयावर ओसंडून वाहणारा आनंद कॅमेऱ्यातही कैद झाला. यानिमित्ताने या दोन वर्षांत महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या पुरुष व महिलांचा तसेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित शकुंतला खटावकर यांचादेखील यथोचित गौरव करण्यात आला. कबड्डी या खेळाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देणाऱया विठ्ठल देवकाते, सुनील सकपाळ यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्व गटाच्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अधिकाधिक गुण मिळविणाऱया पुणे जिल्हा असोसिएशनलादेखील गौरविण्यात आले. भव्यदिव्य उत्कृष्ट स्वरूपात राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल ठाणे जिह्याला सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ पंच आदींचाही सन्मान करण्यात आला. शेवटी या कबड्डी दिनाचे यशस्वी आयोजन केले म्हणून रायगड जिल्हा संघटनेचादेखील सन्मान करण्यात आला. राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर, सचिव बाबूराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, माजी सचिव आस्वाद पाटील, रायगड जिल्हा संघटनेच्या सचिव चित्रा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.