सावकाश जेवा…!

अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

आपल्या पूर्वजांनी आपल्याला प्रत्येक घास बत्तीसवेळा चावून खायला पाहिजे अशी शिकवण दिली, परंतु सध्याच्या जीवनशैलीमध्ये ही गोष्ट शक्य होत नाही. कारण लहान मुलांपासून ते मोठय़ापर्यंत   सगळे व्यस्त असतात.

असे म्हणतात की, बऱयाचशा आजारांचे मूळ आपल्या पोटाच्या आरोग्याशी निगडित असते. त्यामुळे तुम्ही जर सावकाश आणि चावून चावून जेवण केलं नाही आणि जर तुमची पचनसंस्था व्यवस्थित राहिली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच पडू शकतो. अपचन, गॅसेस,
ऑसिडिटीपासून ते वजन वाढणे, डायबेटिस आणि अनेक आजारांना लोकांना तोंड द्यावे लागते.

आपल्या मेंदूला आपण जेवलोय, पोट भरले आहे, अशी नोंद होण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटांचा कालावधी देणे आवश्यक असते. जे लोक फक्त पाच-दहा मिनिटांत आपलं जेवण आटोपतात, त्यांच्या मेंदूला समाधान होत नाही. त्यामुळे एकतर परत परत भूक लागते. अलिकडच्या एका अभ्यासनुसार  काही माणसांनी सहा मिनिटांत जेवण केलं तर काही माणसांनी तीस मिनिटांत! ज्यांनी तीस मिनिटांत सावकाश जेवण केलं त्यांना परत लवकर भूक लागली नाही आणि त्यांनी पुढच्या जेवणामध्ये कमी कॅलरीज खाल्ल्या. हे खूप महत्त्वाचं निरीक्षण आहे.

त्यामुळे सावकाश खाल्ल्याने आपल्याला समाधान मिळतं. आपले भुकेवर नियंत्रण करणारी जी हार्मोन्स आहेत, त्यांच्यावरदेखील नियंत्रण येतं. तसेच मोठमोठे घास घाईघाईने गेल्यामुळे अपचन होण्याची भीती असते. त्यामुळे प्रत्येक घास लाळेत घोळला गेला पाहिजे. कारण की, आपली पचनक्रिया ही पहिल्यांदा लाळेत असलेल्या संप्रेरकामुळे सुरू होत असते.

सुधारणा कशी कराल ठाम निश्चय

एकतर आपण मनातून निश्चय केला पाहिजे की, आपण सावकाश खाल्लं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा मन शांत असलं पाहिजे. म्हणूनच तुम्ही एखाद्या मीटिंगमधून बाहेर पडला आणि तुमच्या डोक्यामध्ये मीटिंगचे विचार असतात आणि तुम्ही घाईघाईने खायला सुरुवात करता.

यासाठी आधी जरा शांत बसा. पाच मिनिटं, दोन मिनिटं, जेवढा वेळ असेल तेवढा दीर्घ श्वास घ्या. मन शांत करा किंवा सरळ ‘वदनी कवळ घेता’ किंवा कुठलीही आपली प्रार्थना करा. त्याच्यामुळे मन शांत व्हायला संधी मिळते आणि आपोआप आपल्याला सावकाश खाण्याचीदेखील प्रेरणा मिळू शकते.

स्वतःचे निरीक्षण करा

दुसरे म्हणजे, तुम्ही जर घाईने खात असाल तर थांबा! स्वतःला  आठवण करून द्या की, मला हळूहळू खायचे आहे आणि सावकाश चावून खायला सुरुवात करा. एकदा ही सवय अंगी बाळगली की, मग हे सारखं सारखं स्वतःला आठवण करून द्यायची गरज नाही.

खाण्याकडे लक्ष द्या

खाताना खूप बोलणे, भांडण, वाद टाळा. तसेच मोबाइल, दूरदर्शन टाळा. लक्ष दुसरीकडे असेल तर भरभर खाल्ले जाते. याउलट पदार्थाची चव, स्वरूप याकडे लक्ष द्या आणि चवीचवीने खा.