सुशासनाच्या निर्देशांकांत 3 भाजपशासित राज्यांसह गुजरात पिछाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जातो. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर 2014 मध्ये हा सुशासन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निमित्ताने केंद्र सरकार सुशासन निर्देशांक जारी करते. त्याअंतर्गत, राज्यांच्या विकास आणि कारभाराचे प्रमाण नऊ मापदंडांवर मोजले जाते. बुधवारी (25 डिसेंबर) केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सुशासन निर्देशांक अहवाल जाहीर केला. यात भाजपाला धक्का देणारी बाब उघड झाली आहे. भाजप आतापर्यंत गुजरात विकासाचे मॉडेल असल्याचा डंका पीटत होते. मात्र 18 मोठ्या राज्यांच्या क्रमवारीत गुजरात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवू शकले नाही. या यादीत गुजरात 6 व्या क्रमांकावर आहे.

भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यांची या क्रमवारीत घसरण झाली आहे. मात्र, या यादीत कर्नाटक राज्य तिसरे स्थान पटकावण्यात यशस्वी झाले आहे. या यादीत तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर, कर्नाटक तिसऱ्या, छत्तीसगड चौथ्या, आंध्र प्रदेश पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच गोवा, झारखंड आणि उत्तर प्रदेश या यादीमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. कृषी व संबंधी विभाग, वाणिज्य व उद्योग, मनुष्यबळ विकास, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक पायाभूत सुविधा, आर्थिक सुशासन, समाज कल्याण व विकास, न्यायिक व सार्वजनिक सुरक्षा आणि पर्यावरण या नऊ मानकांवर राज्यांची क्रमवारी जाहीर केली जाते.  हे सर्व क्षेत्र किंवा विभाग एकूण 50 निर्देशांकांवर मोजले जातात. संबंधित मूल्य मोजण्यासाठी कोणत्याही शासकीय क्षेत्रातंर्गत भिन्न निर्देशांकांना वेगवेगळ्या पद्धतीने मोजण्यात येते.

कृषी व संबंधित क्षेत्रात गुजरात सातव्या क्रमांकावर असून या यादीत गुजरातला एकूण 0.61 गुण मिळाले आहेत. तर 0.73 गुणांसह या क्षेत्रात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. वाणिज्य व उद्योग क्षेत्रात गुजरात 0.92 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर झारखंड या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे. मनुष्यबळ विकास क्षेत्रात गुजरात सातव्या क्रमांकावर, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात 11 व्या, सार्वजनिक पायाभूत सुविधा क्षेत्रात दुसर्‍या क्रमांकावर, आर्थिक सुशासन क्षेत्रात चौथ्या, सामाजिक कल्याण आणि विकास क्षेत्रात 12 व्या स्थानावर आहे. न्यायालयीन आणि सार्वजनिक सुरक्षा क्षेत्रातही गुजरात पिछाडीवर आहे. या क्षेत्रात गुजरात 11 व्या क्रमांकावर आहे. तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रातही गुजरात 11 व्या स्थानी आहे.