वरुणराजा पावणार! यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस; हवामान खात्याने दिली खूशखबर

राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागातील लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. याचदरम्यान यंदा वरुणराजा भरभरून कृपा करणार असल्याची खुशखबर हवामान खात्याने दिली आहे. मुंबई-महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. मुंबईत मान्सूनच्या हजेरीपूर्वी वादळी वारे पुन्हा धडकण्याची शक्यता नाही, असे प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी गुरुवारी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.

राज्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईचे संकट धडकले आहे. त्यातच राजधानी मुंबईत पाणीकपातीची वेळ आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना मान्सूनच्या कृपादृष्टीची प्रतीक्षा आहे. याचदरम्यान कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वरुण राजाच्या दमदार हजेरीचे भाकीत केले आहे. मुंबईत सर्वसाधारणपणे पावसाळय़ात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 2300 मिमी. इतका सरासरी पाऊस पडतो. यंदाचा पाऊस ही सरासरी ओलांडून दमदार हजेरी लावेल. उर्वरित महाराष्ट्रातही पावसाच्या चांगल्या हजेरीची चिन्हे आहेत. राज्यभरातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे हवामानशास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या उन्हाळय़ात नागरिकांना पाण्याचे ‘टेन्शन’ राहणार नसल्याची चिन्हे आहेत.

मान्सूनचे मुंबईत लवकर आगमन

मुंबईकर मागील दोन आठवडय़ांपासून प्रचंड उकाडा व आर्द्रतेचे वाढते प्रमाण यामुळे हैराण झाला आहे. हवामानातील हा बदल मान्सूनचे लवकर आगमन होईल याचे संकेत देत आहे. मुंबईत जूनच्या पहिल्या आठवडय़ातच मान्सूनची हजेरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

हवामान खात्याचा अंदाज ठरतोय खरा

पूर्वी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला की, प्रत्यक्षात नेमके उलटे चित्र दिसायचे. मात्र गेल्या काही वर्षांत हवामान खाते आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर परफेक्टअंदाज वर्तवत आहे. दहा दिवसांपूर्वी धडकलेल्या धुळीच्या वादळाचा अंदाज खरा ठरला होता.

 

मुंबईत दोन रडार; 24 तास मॉनिटरिंग

मुंबईत कुलाबा व वेरावली (जोगेश्वरी) अशा दोन ठिकाणी हवामान खात्याची रडार कार्यान्वित आहेत. येथे शिफ्टमध्ये पुरेसे शास्त्रज्ञ हवामान बदलांचे 24 तास मॉनिटरिंग करतात. दररोज 60 ते 70 शास्त्रज्ञ देशभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतात.