गुगल खरेदी करणार हिंदुस्थानी ‘शेअर चॅट’, तब्बल 7600 कोटींचा व्यवहार होणार

अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी गुगल लवकरच हिंदुस्थानी शेअर चॅटची खरेदी करणार आहे. जवळपास 1.03 बिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल 7600 कोटी रुपयांना हा व्यवहार होऊ शकेल, असा तज्ञांचा अंदाज आहे. गूगलने या लोकप्रिय प्लॅटफॉर्मच्या खरेदीसाठी पुढील बोलणी तसेच कागदोपत्री कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे. मात्र दोन्ही पंपन्यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विक्री व्यवहारावेळी शेअर चॅटचे संस्थापक काही हिस्सेदारी आपल्याकडे ठेवू शकतील, असे तज्ञांचे मत आहे. बंगळुरूतील अंकुश सचदेवा, भानु प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांनी 2015 मध्ये शेअर चॅटची स्थापना केली होती. सध्या अंकुश हे कंपनीचे सीईओ, भानु प्रताप हे सीटीओ, तर फरीद हे सीओओ आहेत. गुगलने खरेदीचा व्यवहार अंतिम केल्यानंतर सध्याचे पाचही गुंतवणूकदार शेअर चॅटमधून बाहेर पडणार आहेत. शेअर चॅटने सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांकडून 4 कोटी डॉलर्स जमवले होते. त्यामुळे कंपनीचा गल्ला 26 कोटी 40 लाख डॉलर्सच्याही पुढे गेला होता. शेअर चॅट 15 प्रादेशिक भाषांमध्ये मजकूर देते. गुगलच्या हाती या प्लॅटफॉर्मची सूत्रे गेल्यास शेअर चॅटचे साम्राज्य आणखी विस्तारणार आहे.

कशी झाली शेअर चॅटची भरभराट?

कोरोना महामारीत शेअर चॅटच्या मासिक ऑक्टिव्ह युजर्सची संख्या 166 टक्क्यांनी वाढली. युजर्सचा आकडा 16 कोटींवर पोहोचला आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात शेअर चॅटवर व्यस्त राहण्याचा सरासरी अवधी 24 मिनिटांवरून 31 मिनिटांपर्यंत वाढला. n चीनच्या ‘टीक टॉक’ अॅपवर बंदी तसेच कोरोनाचे लॉकडाऊन यामुळे शेअर चॅटच्या युजर्सची संख्या वाढली. लॉकडाऊनमध्ये लोकांनी अधिक वेळ सोशल मीडियावर खर्ची घातला.

आपली प्रतिक्रिया द्या