‘गुगल’सोबत भरणार शाळा; महाराष्ट्र बनले देशातील पहिले राज्य, ऑगस्ट अखेरपर्यंत हजेरी सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी आता राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी गुगलच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ मिळाले आहे, गुगलच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग पुन्हा घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची गुरुवारी ऑनलाईन घोषणा करण्यात आली. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गुगल क्लासरूम, गुगल मीटच्या माध्यमातून 2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाची संधी मिळणार आहे. जी स्वीट आणि गुगल क्लासरूमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

गुगल क्लासरूममुळे गृहपाठ, असाईनमेंट, प्रॅक्टीकल्सही पुन्हा सुरू होणार आहेत. गुगलवरच्या शाळेसाठी आतापर्यंत राज्यातील 1 लाख 34 हजार शिक्षकांनी नोंदणी केली असून ऑगस्ट अखेरपर्यंत या गुगलवरील शाळेची हजेरी सुरू होणार आहे. राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी हा गुगल शाळेचा पर्याय विनामूल्य खुला आहे.

नोंदणी केलेल्या शिक्षकांपैकी सुमारे 40 हजार शिक्षकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे माध्यमातून गुगलवरीलशाळेतील शिक्षणासाठी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले असून ऑगस्ट अखेरपर्यत सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन या उपक्रमाचा लाभ राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनाघेता येणार आहे. गुगलवरीलजी स्वीट फॉर एज्युकेशन, गुगल क्लासरूम, गुगल मीटद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांची शाळा घेणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरहीशाळा या जागतिक पर्यायांचावापर विद्यार्थ्यांसाठी करू शकतात. हा एक लाईफटाईम उपक्रम असून त्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण शाळांतील तंत्रस्नेही शिक्षकांना दिले आहे, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक विकास गरड यांनी सांगितले.

शाळांसाठी असे असेल लॉगीन

सरकारी व पालिका शाळा – mahaeschool.ac.in

खासगी अनुदानित शाळा – mahaeschool.co.in

खासगी विनाअनुदानित व इतर – mahaeschool.co.in  

शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी आयडी आणि पासवर्ड

गुगल क्लासरूमसाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापनानुसार लाँगीन आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. तसेच लवकरच शाळांनुसार शिक्षकांना G-suite आयडी व पासवर्डही दिले जाणार आहेत.

कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली

आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

गुगलवरील शाळेची वैशिष्ट्ये

  • तुकडीप्रमाणे वर्ग भरणार. उदा. 9-अ, 5-ब, 7-क.
  • विद्यार्थ्यांची प्रगती, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत समजणार.
  • विद्यार्थ्यांची उपस्थिती, किती शाळांनी वापर केला, किती शाळांनी केला नाही याचे ट्रॅकिंगही.
  • विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास शिक्षकांना तपासताही येणार.