गुगल मॅप्सवर आता कळणार टोलची किंमत, नवीन फीचर जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

प्रवासाला निघाल्यावर गुगल मॅप्समुळे अचूक रस्ते आणि लागणाऱ्या वेळेची माहिती मिळते. यामुळे रोड ट्रिपची प्लॅनिंग करताना मोठी मदत होते. गुगल मॅप्सने आता एक नवीन फीचर जारी केले आहे. या नव्या फिचरद्वारे आपल्याला रस्त्यात लागणाऱ्या टोलबाबत माहिती दिली जाणार आहे. या नव्या फीचरच्या मदतीने गुगल मॅप्स युजर्सना त्यांच्या प्रवासाची प्लँनिंग अधिक उत्तम रित्या करता येणार आहे.

गुगल मॅप्समध्ये देण्यात आलेल्या या नवीन फीचर मध्ये रस्त्यात लागणाऱ्या टोल-किंमतीची माहिती दिली जाईल. स्थानिक टोल प्राधिकरणाकडून टोलशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. यामुळे रोड ट्रिपला जाण्यापूर्वी टोलचा खर्च किती येऊ शकतो याचा हिशेब आधीच करता येणार आहे. यामुळे गुगल मॅप्स युजर्सला रोड ट्रिपच्या प्लॅनिंगमध्ये खूप मदत होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

यामध्ये गुगल मॅप तुम्हाला टोल नसलेल्या रस्त्यांचीही माहिती देईल. याच्या मदतीने तुम्ही टोल न भरून किंवा कमी टोल टॅक्स देऊन दुसऱ्या रस्त्याचा वापर करून पैसे वाचवू शकता. टोल दर आणि मार्गासह गुगल मॅप्सवर टोलमुक्त मार्ग देखील दर्शविण्यात येणार आहेत.

यासाठी गुगल मॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री-डॉटवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला रूट पर्याय निवडून त्या मार्गाचा वापर करता येणार आहे. येत्या महिन्याभरात Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी हि सुविधा सुरु होणार आहे. भारत, यूएसए, जपान आणि इंडोनेशियामधील सुमारे 2000 टोल असणाऱ्या रस्त्यांसाठी हा पर्याय असून येत्या काळात हे फीचर इतर देशांमध्येही सुरु होणार आहे.