लस न घेणाऱयांना नोकरी गमवावी लागणार! गुगलचा कर्मचाऱयांना अल्टिमेटम 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या जगभरात ओमायक्रोनचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने कठोर पावले उचलली असून कर्मचाऱयांना अल्टिमेटम दिला आहे. अद्याप लस न घेणाऱया कर्मचाऱयांची पगार कपात केली जाऊ शकते  किंवा त्यांना नोकरीदेखील गमवावी लागू शकते. एका वृत्तवाहिनीने इंटरनल डॉक्युमेंटच्या आधाराद्वारे हा दावा केला आहे.

रिपोर्टनुसार, गुगलच्या लीडरशिपचा एक मेमो समोर आला आहे. यामध्ये कर्मचाऱयांना व्हॅक्सिनेशन स्टेटसची माहिती देण्यास सांगितले होते. याबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी कर्मचाऱयांना 3 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. आता कंपनीने कर्मचाऱयांना लसीकरणाची मुदत 18 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. मुदतीनंतरही कर्मचाऱयाने लस न घेतल्यास त्याला 30 दिवसांच्या भरपगारी रजेवर पाठवले जाईल. यानंतर त्यांना सहा महिन्यांसाठी विनावेतन वैयक्तिक रजेवर ठेवले जाईल. त्यानंतरही नियम न पाळल्यास कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार आहे.