
अमित घोडेकर
गुगल… तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. काही वर्षांपूर्वी फक्त काही शोधायचे असेल तर आपण गुगल वापरायचो, नंतर कोणाला ई-मेल पाठवायचा असेल तर गुगल वापरू लागलो, नंतर एकमेकांशी संपर्क करायचा असेल तर गुगल वापरू लागलो, नंतर गाडीतून प्रवास करताना मार्ग शोधायचा असेल तर गुगल वापरू लागलो, नंतर एखादी मोठी फाईल सुरक्षित ठिकाणी ठेवायची असेल तर गुगल वापरू लागलो. असे एक एक करत काही वर्षांपासून आपला मोबाईलच गुगलचा झाला. म्हणजे तुम्ही कोणताही मोबाईल घ्या त्यात सबकुछ गुगल, अगदी अल्लादिनच्या जादुई चिरागप्रमाणेच आपला मोबाईल पण आपल्याला हव्या त्या गोष्ठी हव्या तेव्हा देऊ लागला.
एकीकडे जागतिक तंत्रज्ञानाच्या सारीपटावर खूप क्रांतिकारी बदल होत आहेत आणि गुगल हे बदल घडवण्यात आघाडीवर आहे. गेल्या वर्षी गुगलने अनेक अफलातून गोष्टी आपल्यासाठी आणल्या होत्या, पण ते कमी की काय आता गुगल त्याच्याही एक पाऊल पुढे जात आहे आणि एक मस्त गोष्ट आपल्यासाठी आणत आहे ती गोष्ट म्हणजे गुगलची नवीन अॅप नेबर्ली. आजपर्यंत आपण फेसबुक, टि्वटर, ओएलएक्स अगदी फ्लिपकार्ट आपल्या आयुष्यात काय धुमाकूळ घालू शकतात हे बघितले आहे. गुगलची ही नवीन अॅप नेबर्ली कदाचित या सगळ्यांच्या एक पाऊल पुढे असणार आहे. या अॅपमुळे आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार आहे. कदाचित ही अॅप भविष्यातील अनेक बदलांची नांदीदेखील असेल.
गुगल गेल्या कित्येक वर्षांपासून एका गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे. ती म्हणजे लोकेशनवर आधारित सेवा म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी असता त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या सेवा ज्या तुम्हाला उपयोगी पडू शकतील. गुगल नकाशे हादेखील याचाच एक भाग होता जे आजच्या घडीला जगातील सगळ्यात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. गुगलची नवीन अॅप नेबर्ली हीदेखील लोकेशनवर आधारित आहे. हिच्या नावातच ही अॅप कशासाठी वापरली जाऊ शकते हे सांगितले आहे. या अॅपचे नाव आहे नेबर्ली म्हणजेच शेजारचे.
पुढच्या काही दिवसांत बॅँक कधी बंद असेल, आपल्या विभागात स्विंमग पूल कुठे आहे, आपल्या भागात कोणत्या ठिकाणी छान मिसळ मिळते किंवा अगदी मुंबई दर्शनसाठी गाडी कुठे मिळू शकेल असे कोणतेही प्रश्न तुम्ही विचारू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलचे लोकेशन सुरू करावे लागेल आणि तुम्हाला जो काही प्रश्न विचारायचा असेल तो तुम्ही विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या आजूबाजूचे लोकच देतील. म्हणूनच या अॅपचे नाव नेबर्ली ठेवले आहे. उद्देश हाच की, तुमच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या शेजारधर्म पाळून तुम्हाला मदत करावी आणि थांबा त्यासाठी त्यांना गुगल पुरस्कार पण देणार हं.. म्हणजे जो कोणी चांगले उत्तर देईल त्याला वेगळा मान तर मिळेलच, त्याचबरोबर काही तरी पुरस्कार पण मिळेल. भविष्यात गुगल नेबर्ली यलो पेजेसच्या मुळावर येणार हे नक्की, पण गुगल नेबर्लीमुळे आपल्याला अनेक गोष्टी सहजपणे शोधता येतील हे नक्की.
























































