
घरात कोणी नसल्याचे पाहून नोकराने सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. घडल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार या गोराई परिसरात राहत असून त्यांचे भेलपुरीचे दुकान आहे. त्यांच्या घरी पळून गेलेला नोकर हा पूर्वी त्यांच्याकडे काम करत होता. गेल्या आठवडय़ात तक्रारदार यांचे पती साहित्य आणण्यासाठी बाजारात गेले होते. तर तक्रारदार या दुकानात व्यस्त होत्या. तेव्हा घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन नोकराने दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. दुपारी तक्रारदार या घरी आल्या तेव्हा त्यांना नोकर घरात दिसला नाही. त्यांनी कपाट उघडले असता त्यांना दागिन्यांचा डबा आणि पैसे आढळून आले नाहीत.
काही वेळाने तक्रारदार यांचे पती घरी आले तेव्हा त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. तक्रारदारांनी नोकराला फोन केला असता त्याचा फोन बंद होता. नोकराने दोन लाखांचे दागिने आणि एक लाख रुपये रोख घेऊन पळ काढल्याचे उघड होताच तक्रारदारांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या नोकराच्या अटकेसाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.



























































