
गोवंडीतील डम्पिंग ग्राऊंडवर कोरोनामुळे मोठय़ा प्रमाणावर जैविक कचऱयाची वाढ झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना होणारा प्रदूषण तसेच दुर्गंधीचा त्रास रोखण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संबंधित अधिकाऱयांची बैठक बोलवली. या बैठकीत येथील जैविक कचऱयावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात यावी. त्याचप्रमाणे जैविक कचऱयावर प्रक्रिया करणाऱया प्लांटचे अन्यत्र स्थलांतर करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिले.
गोवंडी येथील नागरिकांसह अनेक मुंबईकरांची गोवंडी येथील जैवकचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबईबाहेर नेण्याची मागणी आहे. याविषयीचा प्रश्न आमदार अबु आझमी यांच्याकडूनही उठविण्यात आला होता. याची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. बायोमेडिकल ट्रिटमेंट प्लांटचे स्थलांतर खालापूर येथे करण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.
पाठपुराव्यासाठी दहा दिवसांत पुन्हा बैठक
प्रदूषणावर पर्याय काढण्यासाठी सुनिश्चित आराखडा तातडीने तयार करण्यात यावा. त्यावर येत्या दहा दिवसांत पाठपुराव्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येईल असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

























































