
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपात राज्यातील लाखो अनुदानित शिक्षक सहभागी झाल्याने शाळा, महाविद्यालयांत दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचा खच पडला आहे. विनाअनुदानित आणि सेल्फ फायनान्स शाळांमधील शिक्षक वगळता अनुदानित शिक्षक पेपर न तपासण्यावर ठाम आहेत. दहावीच्या सुमारे 50 ते 60 लाख उत्तरपत्रिकांची तपासणीच अद्याप सुरू झालेली नाही.
मागील तीन दिवसांत झालेल्या दहावीच्या तीन पेपरची आणि त्यापूर्वी झालेल्या काही पेपरच्या उत्तरपत्रिका तपासल्या गेलेल्या नाहीत. बारावीच्या उत्तरपत्रिकाही तशाच पडून आहेत.
उत्तरपत्रिकांचे गठ्ठे सर्व विभागीय शिक्षण मंडळात आणि शाळा, महाविद्यालयांत मोठय़ा प्रमाणावर पडून असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यातील सरकारी अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे एक लाखाहून अधिक शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू झालेल्या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पडत असल्या तरी उत्तरपत्रिका तपासण्याचे कामकाज शिक्षकांनी बंद ठेवले आहे. तपासणीचे काम संप मिटल्यानंतर सुरू होईल. त्यामुळे सध्या हे काम थांबले असले तरी त्याचा फार मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होणार नसल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे 70 ते 80 टक्के काम बंद आहे. विनाअनुदानित आणि सेल्फ फायनान्स शाळांमधील 20 ते 30 टक्के शिक्षक पेपर तपासत आहेत. पेपर तपासणीला होणारा उशीर पाहता सरकारने जुन्या पेन्शन योजनेच्या संपावर तातडीने तोडगा काढावा. अन्यथा यासाठी बोर्डाच्या निकालास उशीर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल.
– मुकुंद आंधळकर, समन्वयक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ.





























































