सरकारी, खासगी लॅबच्या समन्वयामुळे कोरोना चाचण्या अधिक वेगाने होणार

610

मुंबईत कोरोनाचे संशयित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत असल्याने आता कोरोनाची चाचणी करणाऱ्या सरकारी आणि खासगी लॅब एकत्रित काम करणार आहेत. केईएम, हाफकीन व एनआईव्ही, कस्तुरबा, जे. जे. आणि खासगी लॅब आता एकत्रित काम करणार असल्यामुळे कोरोना चाचण्या करणे अधिक वेगाने होणार आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोनाचे संशयित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व संशयित रुग्णांच्या चाचण्या पालिका, राज्य सरकारचे रुग्णालयातील लॅब आणि खासगी लॅबमध्ये स्वतंत्रपणे होत आहेत. मात्र, यापुढे पालिका, सरकारी आणि खासगी लॅब एकत्रितपणे काम करणार आहेत. त्यामुळे सरकारी आणि खासगी लॅबमध्ये अधिक सुसूत्रता येणार असून कोरोना संशयित रुग्णाचे अहवाल अधिक लवकर मिळणार आहे. असे अहवाल लवकर मिळाले तर रुग्ण ओळखणे आणि त्यांच्यावर उपचार करण्याची प्रक्रियाही जलद होणार आहे. आजपासून याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.

अशा होणार चाचण्या

1) केईएम लॅब। – घरातून तसेच शीव आणि केईएममध्ये गोळा करण्यात  आलेले कोरोना संशयितांचे नमुने तपासले जाणार आहे. या लॅबमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोरोनाचे नमुने आले तर ते तपासणीसाठी एनआईव्ही लॅब मध्ये पाठवण्यात येणार आहेत.

2) हाफकीन-एनआईव्ही लॅब – घरातून गोळा करण्यात आलेले आणि थेट आलेल्या संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात येणार आहेत.

3) कस्तुरबा – कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे नमुने तपासण्यात येणार आहेत.

4) जे..जे. लॅब- आजूबाजूची रुग्णालये आणि मुंबईबाहेरून आलेले कोरोना संशयितांचे नमुने तपासण्यात येणार आहेत.

5) खासगी लॅब्स – खासगी रुग्णालयामधून  जे.जे. च्या लॅब मध्ये पाठवलेले नमुने आणि इतर नमुने इथे तपासण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या