
2020-21 या शैक्षणिक वर्षात देशात फक्त 171 नव्या महाविद्यालयांना एआयसीटीईने मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 138 टक्के कमी आहे. गेल्या वर्षी 945 नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांत देशामध्ये खासगी इंजिनीयरिंग व फार्मसी महाविद्यालयांचा सुकाळ झाला होता. यंदा एआयसीटीईने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांमध्ये 70 टक्के महाविद्यालये ही सरकारी आहेत. नव्या इंजिनीयरिंग व फार्मसी महाविद्यालयांना 2022 पर्यंत मान्यता न देण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतला आहे. तरीसुद्धा नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. कारण ज्या जिल्ह्यांमध्ये पुरेसी महाविद्यालये नाहीत तेथील विद्यार्थ्यांकडून सरकारी महाविद्यालये सुरू करण्याची मागणी झाली होती. त्यामुळे नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली गेली, अशी माहिती एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली.
नव्या महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन महाविद्यालयांची संख्या इंजिनीयरिंगपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात सात नव्या महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. त्यात दोन महाविद्यालये ही सरकारी अनुदानित आहेत. व्यवस्थापन महाविद्यालयांची संख्या दरवर्षी वाढत असली तरी कोरोना पार्श्वभूमीवर त्यामधील प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊ शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यावर जोर
एआयसीटीईच्या बंदीमुळे मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांच्या जागाही कमी झाल्या आहेत. महाविद्यालयांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, मशीन लर्निंग, डाटा सायन्स ऍण्ड ऍनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग ऍण्ड रोबोटिक्स हे नवे पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू करावेत अशी शिफारसही एआयसीटीईने केली आहे.
यंदा 179 महाविद्यालये बंद पडली
यंदा देशातील सर्वाधिक 179 इंजिनीयरिंग महाविद्यालये बंद पडली. 44 महाविद्यालयांनी 2021 वर्षाच्या मान्यतेसाठी भरलेले अर्ज मागे घेतले तर 762 महाविद्यालयांनी आपल्याकडील जागा कमी करण्यासाठी अर्ज केले. त्यामुळे सुमारे 2.63 लाख जागा कमी झाल्या आहेत.



























































