
सामना प्रतिनिधी । मुंबई
दादरच्या इंदू मिल येथील साडेबारा एकरांच्या जागेवर उभारण्यात येणाऱया स्मारकातील ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाची उंची 100 फुटांनी कमी करण्यात आली आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आज केला.
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाची उंची घटवण्याच्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतानाच चौकशी न झाल्यास ‘रिपब्लिकन सेना’ पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आंबेडकरी समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून सुरू असून तो आम्ही हाणून पाडू असे सांगून आनंदराज म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाची उंची 350 फूट इतकीच असली पाहिजे. त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत.
– इंदू मिल येथील स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाची उंची 350 फूट इतकी असेल असे सरकारने मान्य केले होते. पण नव्या आराखडय़ानुसार पुतळय़ाखालचा चबुतरा 99 फूट उंचीचा असणार आहे तर पुतळय़ाची प्रत्यक्षातील उंची 251 फूट इतकी राहणार आहे.


























































