
राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्यांचे आदेश आज सरकारने जारी केले. त्यानुसार नवी मुंबईचे कौशल विकास आयुक्त नितीन पाटील यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर ए. बी. धुळज यांना महासंघावरून उचलून थेट मंत्रालयातील ओबीसी बहुजन कल्याण विभागात सचिव म्हणून आणण्यात आले आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लहू माळी यांच्याकडे आता नवी मुंबईचे कौशल्य विकास आयुक्त म्हणून जबाबदारी असणार आहे.
छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांची महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. मुरुगनथम एम. यांच्याकडील गोंदिया जिल्हा परिषदेचा कार्यभार काढून त्यांची नियुक्ती बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे.